दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर काळाचा घाला

31 Dec 2025 17:15:43
कारंजा लाड, 
Car Accident : शेगाव येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. कारंजा —मूर्तिजापूर मार्गावरील भडशिवनी रेल्वे फाटकाजवळ अज्ञात वाहनाने कारला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.
 
 
ACC
 
अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन घटनास्थळावरून पसार झाले. अपघातातील मृत महिलेचे नाव रेखाबाई प्रयाग जाधव वय ६० रा.घोटी ता.जि.यवतमाळ असे असून , त्या कारमधून इतर नातेवाईकांसह शेगाव येथे दर्शनासाठी जात होत्या. या अपघातात करुणा रवी राठोड वय ३५ रा.कामठवाडा ता.जि.यवतमाळ यांच्यासह इतर दोन लहान मुले जखमी झाली आहेत. बंडू चतुरकर व अजय काकड यांनी घटनेची माहिती तात्काळ रुग्णवाहिका चालकाना दिली. त्यानुसार रुग्णवाहिका चालक विनोद खोंड, शंकर रामटेके, शिवम खोंड व अजय घोडेस्वार हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रेखाबाई जाधव यांना मृत घोषित केले. तर उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेरगावी नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर अचानक ओढावलेल्या संकटामुळे शोककळा पसरली आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी कारंजा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0