जिल्ह्यात ठिकठिकाणी तलाठ्यांचे ‘धरणे आंदोलन’

31 Dec 2025 20:14:32
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-talathis-sit-in-protest : जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्यांबाबत वारंवार 10 ते 12 निवेदने सादर करण्यात आली. तसेच वेळोवेळी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केल्यावरही फक्त आश्वासनाव्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही. त्यामुळे या संदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे समजून जिल्ह्यातील सर्व तलाठी संवर्गाची व विदर्भ पटवारी संघाची धारणा झाल्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यात ठिकठिकाणी तहसील कार्यालयासमोर 31 डिसेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
 
 

y31Dec-Dharane 
 
 
 
तलाठी संवर्गाच्या मागण्यांसाठी तलाठ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे. यवतमाळात सुद्धा हे आंदोलन करण्यात आले आहे. या दरम्यान तलाठी संवर्गाची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी मागील 15 वर्षांपासून अद्ययावत नाही. ती यादी तत्काळ अद्ययावत करावी, तसेच इतर मागण्यांचेही निवेदन प्रशासनाला दिले.
 
 
निवेदनात, तलाठी संवर्गाची मंडळ अधिकारी पदोन्नतीसंवर्गात पदोन्नती देण्यात यावी. कालबाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटर बदलून द्यावे, अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान वाटपावरील नियमांनुसार 0.25 टक्के प्रशासकीय खर्च मेहनताना द्यावा, जिल्ह्यातील भाड्याने असलेल्या तलाठी कार्यालयांना भाडे देण्यात यावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे अध्यक्ष भरत पिसे, सचिव चेतन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
तलाठ्यांचे पुसद येथे एकदिवसीय धरणे आंदोलन
 
 
पुसद : विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसद यांनी तहसील कार्यालय पुसद येथे 31 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. हा आंदोलनाचा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा 2 जानेवारी रोजी असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 6 जानेवारीपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात येणार आहे. धरणे आंदोलनासाठी विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसदचे सचिव मनोज कोरडे, उपाध्यक्ष सदानंद मस्के, कोषाध्यक्ष संदीप राऊत, माजी जिल्हाध्यक्ष कामराज चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय मार्कडसह तहसील कार्यालय पुसदमधील सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
 
 
दारव्ह्यातही तलाठ्यांचे धरणे
 
 
दारव्हा : जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्याबाबत आश्वासनाव्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तलाठी संवर्गाची व विदर्भ पटवारी संघाद्वारे दारव्हा तहसील कार्यालयासमोर 31 डिसेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास समोरील आंदोलन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती जिल्हा सचिव चेतन ठाकरे यांनी दिली आहे.
 
 
पांढरकवडा तहसीलसमोर तलाठ्यांचे धरणे
 
 
पांढरकवडा : बुधवार, 31 डिसेंबर रोजी केळापूर तहसीलसमोर तालुक्यातील तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने वेळेत सोडवणूक न केल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. हे आंदोलन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांचे मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघ नागपूर-2 उपविभाग शाखा केळापूर पदाधिकारी शालिक कन्नाके (अध्यक्ष), जगमित्र तुमरे (उपाध्यक्ष), दीपक पवार (सचिव), रामेश्वर कुमरे (सहसचिव), कुमारी पौर्णिमा कनाके (कोषाध्यक्ष) यासह तालुक्यातील पटवारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
Powered By Sangraha 9.0