भंडारा,
ACB trap, प्रधानमंत्री आवास योजनेतील (घरकुल) लाभार्थ्यांच्या यादीतील नाव पहिल्या टप्प्यात मंजूर करून देण्यासाठी चक्क १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका लाचखोर ग्रामसेवकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही मोठी कारवाई गुरुवारी (४ डिसेंबर) मोहाडी तालुक्यातील विहिरगाव येथे करण्यात आली. प्रफुल्ल रतन गिरी (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

ग्रामसेवक गिरी याने मे २०२५ मध्ये विहीरगाव येथे घरकुल संबंधाने सेल्फ सर्व्हे केला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या वडिलांच्या घराचा सुद्धा सेल्फ सर्व्हे झाला होता. सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संबंधीतांना घरकूल मंजूर होणार होते. तक्रारदार यांचे वडिलांचे घरकूल यादीमधील पहिल्या टप्प्यात नाव मंजूर करून देण्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक गिरी याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीदरम्यान, ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याने त्याच्या कार्यालयात पंचासमक्ष १५ हजारांची लाचेची मागणी स्वीकारण्याची सहमती दर्शवली.
ग्रामपंचायत कार्यालयात सापळा..
कारवाई दरम्यान ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याने तक्रारदार यांचेकडून १५ हजारांची लाच रक्कम स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ त्यांना अटक केली. त्याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाने पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.