बेशिस्त वाहनचालकांना ‘शिस्त’ लावणार ‘इंटरसेप्टर’

05 Dec 2025 20:44:38
गोंदिया,
interceptor vehicle रस्ते अपघातावर नियंत्रणासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिस दलात आता आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ‘इंटरसेप्टर’ वाहन दाखल झाले आहे. शुक्रवार 5 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता गोंदिया-तिरोडा मार्गावरील भागवतटोला येथे ‘इंटरसेप्टर’ वाहन यंत्रणा जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. या यंत्रणेने पोलिस दल अधिक सक्षम होणार आहे. जिल्ह्यातील वाहतूक शाखेच्या ताफ्यात अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन दाखल झाले असून या वाहनांच्या मदतीने वाहतूक शिस्त राखण्याचे उद्दिष्ट पोलिस प्रशासनाने ठेवले आहे.
 

Gondia police, interceptor vehicle, 
गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक शिस्तीचे आव्हान दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या वाहनामुळे रस्त्यावर होणारे नियमभंग, वेगमर्यादा उल्लंघन, तसेच धोकादायक वाहनचालकांवर पोलिसांना थेट कारवाई करणे आता शक्य होणार आहे. या वाहनामुळे वेगमर्यादा ओलांडणार्‍या वाहनांचे अचूक फोटो, वेळ व ठिकाणाची माहिती या प्रणालीकडून आपोआप नोंदवली जाते. या वाहनाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा प्रारंभ झाला आहे. भविष्यात अशा वाहनांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आज पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात व हस्ते जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक नागेश भास्कर, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक पुरुषोत्तम अहिरकर, रामनगरचे पोलिस निरिक्षक प्रवीण बोरकुटे, वाहतुक शाखेचे वसीम पठाण, सय्यद यांच्यासह दतर कर्मचारी यांच्या उपस्थित या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
इंटरसेप्टर वाहनाचे उद्दिष्ट केवळ दंड वसूल करणे नाही तर, वाहनचालकांना वाहतूक नियमांसंदर्भात शिस्त व सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करणे आहे. वाहतूक शिस्त, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व जनतेचा विश्वास निर्माण करणे या त्रिसूत्री उद्दिष्टासाठी इंटरसेप्टर वाहन मोलाची भूमिका बजावेल.
-गोरख भामरेपोलिस अधीक्षक, गोंदिया
वाहनचालकांनी नियमानुसारच वाहन चालवावे, नियम मोडल्यास, उल्लंघन केल्यास या वाहनाच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाही देखील केली जाईल.-नागेश भास्करपोलिस निरिक्षक, जिल्हा वाहतुक शाखा, गोंदिया
यासाठी दंड आकारला जाणार
अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनांमध्ये 4 डी रडार स्पीडगन, ब्रेथ अ‍ॅनालायझर, टिंट मीटर, पी. ओ. सिस्टम, रडार, लेजर प्रणाली, कॅमेरा, प्रथमोचार किट, तसेच फायर एक्स्टिंग्विशर अशी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. या साधनसामग्रीच्या साहाय्याने वाहनचालकांनी केलेल्या वेगमर्यादेच्या उल्लंघनासह, विना हेल्मेट, ट्रीपलसीट, मोबाईलवर बोलणे, चुकीच्या लेनमध्ये व बाजूने वाहन चालविणे, फँसी नंबर प्लेट, विना सीटबेल्ट, मद्यपान करून वाहन चालवणे आदी वाहतूक नियमभंग करणार्‍या घटनांवर त्वरित कारवाई करता येणार आहे. जिल्हा वाहतूक शाखेकडून या वाहनावर कार्य करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी, पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. ते नियमितपणे शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी गस्त घालून नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करतील.
Powered By Sangraha 9.0