तिवसा,
Mojhari Bypass, अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी बायपास मार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक महिन्यांपासून भाविकांमध्ये तीव्र नाराजी होती. विविध राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे निवेदने देऊन मागणी केली होती. अखेर त्यांनी फलक लावले असून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही बायपासवर गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे.

गुरुकुंज मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असल्यामुळे येथे वर्षभर हजारो मंडळी येतात, शैक्षणिक सहली व धार्मिक यात्रेसाठी येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देतात. नुकत्याच तयार झालेल्या बायपासमुळे वाहतूक थेट बाहेरून वळवली जाते. पूर्वी सर्व वाहनांची ये-जा आश्रममार्गानेच होत होती. नव्या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने गुरुकुंज आश्रमाकडे जाणारा रस्ता ओळखणे कठीण होत होते. मोझरी असा एकेरी उल्लेख असलेल्या साईनबोर्डमुळे आश्रममार्गाचे लोकेशन समजत नव्हते. अनेकदा प्रवासी चुकीच्या दिशेने जात राहिल्याने संताप आणि गैरसोय वाढत होती. अखेर फलक लागल्यामुळे प्रवाशांना मदत झाली असली तरीही अपुर्या सुविधा आणि गतिरोधका अभावी भक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसाच कायम आहे.
तात्काळ गतिरोध लावा
मोझरी बायपासवर योग्य सुविधा नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अनेकवेळा मी स्वतः अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तेथील परिस्थिती किती भयानक आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. या मार्गावर तात्काळ गतिरोधक बसवणे अत्यंत आवश्यक आहे.
-जसबीर ठाकूर
अध्यक्ष, युवक काँग्रेस तिवसा