अर्जुनी मोरगाव,
Navegaon Bandh National Park, दोन वाघांच्या झालेल्या झुंजीत एका २ वर्षाच्या नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील उघडकीस आली. सदर वाघाचे नाव ठेवण्यात आले नसल्याची माहिती असून झुंजीदरम्यान, त्याच्या डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमीक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान अंतर्गत कालीमाती संरक्षण कुटी येथील वनरक्षक आणि संरक्षण मजूर यांनी पहाटेच्या सुमारास वाघांच्या डरकाळीचा आवाज ऐकला. दरम्यान, सकाळच्या सुमारास वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना गवतामध्ये सदर वाघ जखमी अवस्थेत आढळला. याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना दिली. माहिती मिळताच क्षेत्र संचालक पियुष जगताप, उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, विभागीय वनाधिकारी अतुल देवकर, उपविभागीय वनाधिकारी बाळकृष्ण दुर्गे आणि वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके यांनी जलद बचाव दलासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी सदर वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसले. मृत वाघ अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा व १३० किलो वजनाचा नर वाघ असून त्याच्या मानेवर व डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे त्याचा दुसर्या वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तरीयतपासणीनंतर अंत्यसंस्कार
या घटनेची नोंद वन्यजीव विभागातर्फे करण्यात आली असून जवळील बकी पर्यटन गेट परीसरात त्या वाघाची उत्तरीय तपासणी करून त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एनटीसीए प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, भीमराव लाडे, व्याघ्र प्रकल्पाचे कंत्राटी पशु वैद्यकीय अधिकारी मेघराज तुलावी यांच्यासह स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी आणि उपस्थित होते.