मेळघाटात राजपत्रित अधिकार्‍यांचा दौरा

05 Dec 2025 11:07:01
धारणी, 
melghat ५ डिसेंबर रोजी प्रधान सचिव, उपायुक्त एकात्मिक बालविकास, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या सोबतच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे सहसचिव डॉ. बी. जी. पवार सुद्धा मेळघाटात येत आहेत. पाणी पुरवठा सहसचिवांची खडीमल आणि खंडूखेडा व घटांग मार्गे कोयलारी भेट व पाहणी नियोजित असून माखला येथे प्रचंड पाणीटंचाई असून साहेबांनी माखला भेट देऊन पाहणी करावी, असे आवाहन माखलाच्या आदिवासींनी केले आहे. या अधिकार्‍यांपुढे ग्रामस्थ आपल्या व्यथा मांडणार आहेत. धारणीपासून ५५ कि. मी. अंतरावरील सेमाडोह जवळच्या माखला येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई बारमाही असते.
 
 

melghat 
 
 
येथील पाण्याविषयी सामाजिक कार्यकर्ता गजानन काकड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे खडीमल, कोयलारी व खंडूखेडाचा दौरा आटोपताना परतीचा रस्ता माखला या गावावरून सहसचिवांनी निवडावा व माखला गावातील पाण्याची ऐतिहासिक टंचाईची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक आदिवासींनी केली आहे. माहितीनुसार, माखला गावातील टेंभरूढाणा भागात स्वतंत्र नवीन पाण्याची टाकी व लोखंडी पाईप लाईनची आवश्यकता आहे. ७ हॉर्सपॉवरची मोटार चालेल, अशी सोलर किंवा अंडरग्राऊंड वीज आणण्याची गरज आहे. सध्या सर्व जुन्या योजना ठप्प पडलेल्या असून महिलांना दुरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. माखला गाव खडीमल येथून जेमतेम ५ कि. मी. असल्याने माखला येथे भेट देऊन सेमाडोह मार्गे परतवाडा जाण्याची विनंती आदिवासींनी केली आहे. माखला गावात पाण्याची प्रचंड टंचाई नेहमी असते.melghat गाव उंच डोंगरावर असल्याने शासनाद्वारे वीज व पाणी पुरवठ्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या उपक्रमांचे जीवन फारच अल्प राहात असल्याने विजेचा व पाण्याचा प्रश्न नेहमी कायम असतो. न्यायालयाने निर्देश दिल्याने या भागाला समस्यांच्या निदानाची आशा वाटत आहे. डॉ. पवार यांनी माखला गावातील पाणीटंचाईच्या समस्येचे मूळ शोधण्यासाठी माखला गावाचे निरीक्षण करावे, अशी तहानलेल्या आदिवासींची मागणी आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0