वर्धा,
Wadsa drug raid, ganja sale नजीकच्या धोत्रा रेल्वे परिसरातील ढाब्यातून चक गांजा व दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ रोजी कारवाई करून गांजा व दारूसह रोख जप्त करून गुन्हा दाखल केला.
गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा-पुलगाव मार्गावरील जय महाकाली नामक ढाब्यावर छापा टाकला. पोलिसांनी रत्नेशकुमार तिवारी, अजय आडे दोन्ही रा. धोत्रा (रेल्वे) या दोघांना ताब्यात घेत ढाब्याची पाहणी केली असता ढाब्यातून गांजा व दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ७०१ ग्रॅम गांजा व देशी-विदेशी दारू व इतर साहित्य जप्त केले. शिवाय एम. एच. ३२ ए. झेड. ५०९५ व एम. एच. ३२ ए. एम. ३५७८ क्रमांकाचे वाहनही जप्त केले. दारू पप्पू सेवेकर रा. सालोड याच्याकडून तर गांजा हमीद शेख रा. पुलगाव याच्याकडुन खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ढाबा अंकित जयस्वाल रा. सावंगी मेघे याचा असून तो त्याने अवैध व्यवसायासाठी दिल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, अखिल इंगळे यांनी केली.