माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपायोजना आवश्यक

06 Dec 2025 19:45:28
अमरावती, 
maternal-and-child-mortality : जनहित याचिकेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्यविषयक समस्या समजून घेतल्या. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीसोबतच, यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाची सुरुवात गाव पातळीवरून होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. विनायक निपुण यांनी केले.
 
 
 
AMT
 
 
मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशानुसार विविध यंत्रणांनी मेळघाटचा दौरा केला. यानिमित्ताने याचिकाकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक घेण्यात आली. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे आयुक्त कैलास पगारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
 
 
सचिव डॉ. निपुण म्हणाले, दौर्‍यामध्ये मेळघाटातील प्रामुख्याने आरोग्यसेवा, माता व बालकांचे पोषण, रस्ते, वीज, पाणी, संपर्काची सुविधा, इंटरनेट आदी समस्या समोर आल्यात. आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने या भागातील रिक्त पदे भरणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी, यासाठी एक प्रकारचे अभियान राबवावे लागणार आहे. त्यासाठी काही मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने येथील नागरिकांची आरोग्यविषयक मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
 
 
मेळघाट परिसरात आरोग्यविषयक पर्यायी खासगी यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय सुविधांचे महत्त्व आहे. या आरोग्यविषयक सर्व सेवा सुधारणे आवश्यक आहे. मेळघाटातील एकंदरीत सर्व चित्र बदलण्यासाठी किशोरवयीन मुलांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. युवक आणि गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन विकासाला सुरुवात करावी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही समस्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे. आदिवासींसाठी आरोग्याचा कृती आराखडा करावा लागणार आहे. यात एकदा यंत्रणा तयार झाल्यावर आदिवासींमध्ये सातत्याने आरोग्यविषयक उपाययोजना होण्यास मदत मिळेल. उपाययोजना शासनाला सुचविण्यात येतील. खासगी-सार्वजनिक सहभाग याबाबतही पडताळणी करण्यात येईल. यावेळी शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सहा पथकांनी मेळघाटातील दौर्‍यानिमित्त केलेल्या पाहणीचे सादरीकरण झाले. याचिकाकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. आशिष सातव, अ‍ॅड. बंड्या साने यांनी मेळघाटातील आरोग्यविषयक प्रश्नांची माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0