महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस

06 Dec 2025 16:21:52
नागपूर,
chandrashekhar bawankule बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात खोटे, निराधार व बदनामीकारक आरोप केल्याने त्यांना बावनकुळे यांनी वकिलामार्फत पाच कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
 
 
chandrashekhar bawankule
 
 
बदनामीकारक, बेजबाबदार विधाने तात्काळ मागे घेऊन त्यांचे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक माध्यमासह समाज माध्यमांवरील प्रसारण थांबवावे, पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांबाबत बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी तसेच सर्व माध्यमांत व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुद्धिपत्रक जाहीर करून मानहानी केल्याने १५ दिवसांत पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई अदा करावी असेही नोटीशीत नमूद आहे. चार डिसेंबर २०२५ रोजी नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन सुलेखा कुंभारे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात खोटे, निराधार व बदनामीकारक आरोप केल्याचे या नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. ही पत्रकार परिषद विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली.chandrashekhar bawankule कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत श्रीमंत उमेदवारांना पाठिंबा देणे, त्यांच्या सहकाऱ्याला ‘दलाल’ संबोधणे, काळ्या पैशांचे संरक्षण करणे तसेच बोगस मतदानाला प्रोत्साहन देणे असे गंभीर आरोप सार्वजनिकरीत्या केले आहेत. हे सर्व आरोप पूर्णतः खोटे, आधारहीन व दिशाभूल करणारे असून, त्यामुळे बावनकुळे यांची राजकीय, सामाजिक व वैयक्तिक प्रतिमा समाजात मलिन झाल्याचे नोटीशीत म्हटले आहे.
नोटीशीतील सर्व मुद्द्यांची पूर्तता न केल्यास कुंभारे यांच्याविरोधात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच या कारवाईत होणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी पूर्णतः त्यांच्यावरच राहील, असे स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0