वर्धा,
cotton-sap-extraction : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात २ लाख १६ हजार ८२३.४५ हेटरवर कपाशी पिकाची लागवड झाली. पण, वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीचा पिकांना चांगलाच फटका बसला. त्यानंतर शेतकर्यांनी पिकाची निगा घेतली. सध्या कापूस उत्पादक शेतकर्यांकडून कापूस वेचणीच्या कामाला गती दिली आहे. जिल्ह्यात कापसाची पहिली वेचणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी दुसरी तर कुठे तिसरी वेचणी सुरू झाली आहे. असे असले तरी कपाशी पिकावर रस शोषण करणार्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

यंदा खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिली. नंतर वेळोवेळी जिल्ह्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थितीचे संकट ओढावले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी व इतर पिकांना फटका बसला. त्यानंतर चारकोल रॉट व यलो मोझॅकने सोयाबीन उत्पादकांचे कंबरडेच मोडले. कापणी व मळणीचा खर्चही निघणार नाही हे लक्षात आल्यावर अनेक शेतकर्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडली. तर काहींनी पिकाला आगीच्या हवाली केले. एकूणच यंदा सोयाबीन उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या संकटातून बचावलेल्या कपाशीची शेतकर्यांनी वेळोवेळी योग्य निगा राखली. त्यामुळे पिकाची वाढही बर्यापैकी होऊन झाडांना बोंड आली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांनी कापसाचा पहिला वेचा पूर्ण केला. सध्या काही ठिकाणी कपाशीचा दुसरा तर काही ठिकाणी कापसाचा तिसरा वेचा सुरू आहे. पण, कापूस वेचणीसाठी वेळीच मजूर मिळत नसल्याने मिळेल तेथून मजूर शेतकर्यांना आणावे लागत आहे.
सेलू तालुक्यातील २ गावांत बोंडअळीचा प्रादुर्भाव
क्रॉपसॅपच्या अहवालानुसार सेलू तालुयातील वहितपूर व पिंपळगाव या गावांमधील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. वहितपूर येथे ७४ हेटर तर पिंपळगाव येथे १९६ हेटरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.
तुरीवर पाने गुंडाळणारी अळी अन् मर रोग
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात ५९ हजार ४९७.६० हेटरवर तूर पिकाची लागवड झाली आहे. सध्या तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. असे असले तरी तूर पिकावर सध्या पाने गुंडाळणारी अळी व मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळी व मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे तूर उत्पादक शेतकर्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.