गोंदियात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

06 Dec 2025 18:01:55
गोंदिया,
Gondia, suspicious death, गळफास लावल्याच्या स्थितीत एका विवाहितेचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवार 6 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास शहरातील गणेशनगरातील गणेश अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. सरीता पराग अग्रवाल (27) असे मृताचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून ही आत्महत्या की हत्या? चर्चेला उधाण आले आहे. सरीताने आत्महत्या केली नसून, पती, सासू आणि ननंदेने मारहाण करून हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप भाऊ विजय गुप्ता आणि प्रदीप गुप्ता यांनी केला आहे.
 

Gondia, suspicious death, 
छतीसगड राज्यातील डोंगरगड अंचोली येथील डिगनलाल गुप्ता यांची मुलगी सरीता हिचा विवाह 2023 मध्ये झाला. लग्नानंतर काही महिने संसार सुरळीत सुरू असतानाच पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यामुळे दोघांमध्येच किरकोळ कारणावरून भांडण होत होते. पती पराग अग्रवाल तिला नेहमी मारहाण करीत होता. सरीताची सासू आणि ननंदही तिचा छळ करीत होते. घटनेच्या दिवशी अर्थात शुक्रवारी (ता. 5) रात्री साडेअकराच्या सुमारास सरीताला हृदयविकाराचा धक्का आल्याचे तिच्या माहेरच्यांना अग्रवाल कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ते गोंदियात मुलगी सरीताच्या घरी पोहोचले. तेव्हा सरीता मृतावस्थेत आढळली. यानंतर प्रेताची पाहणी केल्यावर तिच्या गालावर, पायावर व मानेवर मारहाणीचे व्रण होते. यावरून मारहाण केल्यानंतर तिला फासावर लटविण्यात आले आणि तिची हत्या करण्यात आली. असा आरोप भाऊ विजय गुप्ता आणि प्रदीप गुप्ता यांनी केला आहे. दरम्यान, याबाबतची तक्रार गोंदिया शहर पोलिसात करण्यात आली असून, पोलिसांनी सरीताचा पती पराग अग्रवाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

परागला बनावट दारू प्रकरणात मिळाला जामीन
शहरातील वाजपेयी वॉर्डात बनावटी दारू कारखान्यावर शहर पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी धाड टाकली. या कारखान्याचा संचालक पराग रमन अग्रवाल (31) असल्याचे तपासात पुढे आले होते. या प्रकरणात परागला अटक करण्यात आली होती. बनावट दारू व इतर साहित्यासह 11 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसानी त्याच्याकडून जप्त केला होता. आठवडाभरापूर्वीच तो जामीनावर आला आहे.
चिमुकली कायरा मातृछत्र हरवले
 
सरीताला दीड वर्षांची कायरा नावाची मुलगी आहे. सरीताच्या मृत्युमुळे कायरा आता पोरकी झाली आहे
.
तक्रारीवरून घटनेची नोंद करण्यात आली आहे. मृताचा पती परागला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सांगता येईल.
 
- किशोर पर्वते
पोलिस निरिक्षक, शहर पोलिस ठाणे
Powered By Sangraha 9.0