प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया,
Gondia tiger conflict, वाघांच्या अधिवासासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील वातावरण पोषक असल्यामुळे गेल्या १० वर्षांत गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याचे शुभ संकेत मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चौफेर वाघांचा अधिवास आहे. त्यात आता गाभा क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी या वाघांचा रक्तरंजित खेळ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या झुंजीत तीन वाघांचा जीव गेला असून यात टि-४च्या छाव्यासह नागझिर्याच्या राजा टि-९ चाही समावेश आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पामुळे गोंदिया जिल्ह्याला वनवैभव लाभले आहे. जंगलातील ६५३.६७ चौरस किमी क्षेत्रफळ गाभा क्षेत्रात मोडते. विशेष म्हणजे, गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील हा जंगल मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. ज्यामध्ये नागझिरा ते पेंच, नागझिरा नवेगाव- ताडोबा, नागझिरा-उमरेड, पवनी, कर्हांडला अभयारण्य असा एक कॅरिडोर आहे. त्यामुळे वाघांचा हा भ्रमणमार्ग आहे. मागील गणनेनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जवळपास २० ते २२ वाघ असल्याचे अंदाज असून चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वाघिणींना नवेगाव-नागझिर्यात सोडण्यात आल्याने आणि त्या पाठोपाठ जावई नामक नव्या वाघाने गेल्या वर्षी ऐंट्री केल्याने वाघाच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या अस्तित्वासाठी या वाघांची झुंज सुरू झाल्याचे गेल्या वर्षभरापासून दिसून येत आहे. याची प्रचिती पुन्हा गुरुवार ४ डिसेंबर रोजीच्या घटनेवरून आली. गुरुवारी सकाळी नवेगाव राष्ट्रीय उद्यान परीसरात एका दोन वर्षीय छाव्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तेथील कर्मचार्यांच्या मते दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही सलग दोन दिवस अशाच घटना जिल्ह्यात घडल्या होत्या. जावई म्हणून नामकरण झालेल्या नव्या वाघाने नागझिराच्या गाभा क्षेत्रात ऐंट्रीकरून २२ सप्टेंबर २०२४ रोजी नागझिरा अभयारण्य अंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा १, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात नागझिराचा राजा म्हणून ओळख असलेल्या टि-९ वाघाला ठार केले होते. तर सलग दुसर्या दिवशी २३ सप्टेंबर रोजी कक्ष क्रमांक ९९ मध्ये सकाळी टी-४ या वाघिणीचा छावा मृतावस्थेत सापडला होता. त्याचाही मृत्यू झुंजीदरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात गुरुवारच्या घटनेतही हाच अंदाज असून या झुंजीतील जखमी वाघाचा या परीसरात अधिवास असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरीकांनीही सावध राहणे गरजेचे आहे.
टेरीटोरीसाठी वाघांच्या झुंजी...
वन्यप्राण्यांच्या बाबतीत असे घडते. फिमेल वाघिण अथवा आपली टेरीटोरी कायम करण्यासाठी वाघांच्या झुंजी होत असतात. त्यातच नवेगाव-नागझिर्यात ३० ते ३५ वाघ राहू शकतात एवढे क्षेत्र असून त्या तुलनेत वाघांची संख्या कमी आहेत. परीणामी त्यांना टेरीटोरी करण्यासाठी किंवा फिमेल वाघिणीसाठी जास्त फिरावे लागते, त्यातूनच हे संघर्ष होत असतात.
- मुकूंद धुर्वे, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया