राजुरा,
immoral-relationship-husbands-murder : अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील हरदोना (बु.) येथे शनिवार, 6 डिसेंबर रोजी घडली. राजेश नारायणलाल मेघवंशी (40, रा. अरजिया, जि. भिलवाडा, राजस्थान) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी दुर्गा मेघवंशी (33) आणि तिचा प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी (40) यांना अवघ्या एक तासात अटक करण्यात आली.

मृतक राजेश मेघवंशी, त्याची पत्नी दुर्गा व चंद्रप्रकाश मेघवंशी हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील मूळ रहिवासी आहे. दुर्गा ही आपला प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी याच्यासह राजुरा तालुक्यातील हरदोना (बु.) येथे मुक्कामी होती. राजेश मेघवंशी याला याबाबत कळताच तो पत्नीचा शोध घेत आपल्या मित्रासह हरदोना (बु.) येथे पोहचला. यावेळी राजेश याने माझ्या पत्नीला तू पळवून का आणले, असे चंद्रप्रकाश यास विचारले असता दोघांमध्ये वाद झाला. यावेळी चंद्रप्रकाश याने दुर्गाच्या मदतीने राजेश डोक्यावर तलवारीचे वार करून त्याची हत्या केली. या बाबतची तक्रार मृतक राजेशचा मित्र जगदिश मेघवंशी यांनी राजुरा पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी चंद्रप्रकाश मेघवंशी व दुर्गा मेघवंशी यांना गडचांदूर येथील अंबुजा फाटा येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता. आरोपीने व पत्नीने कट रचून गुन्हा केल्याचे तपासात निष्पण झाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त केली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक चौगले, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, गुन्हे शोध शाखा पथकाचे प्रभारी पोलिस उप निरीक्षक दिपक ठाकरे, सहायक फौजदार किशोर तुमराम, हवालदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, कैलास आलाम, रामेश्वर चाहारे आदींनी केली.