दीप्ती राखुंडे/रेवती जोशी
leopards-women महिला आणि दागिने हे एक अतूट नातं आहे. सोन्याचांदीच्या दागिन्यांपासून शंख-शिंपले आणि रंगीत दगडांच्या माळा महिलांना नेहमीच आकर्षित करीत आल्या आहेत. स्वत:ला सजविण्यासाठी रंग आणि सुगंधाचा प्राधान्याने वापर करणारी स्त्री फुलं आणि मौल्यवान दगडांना प्राधान्य देत आली आहे. हे दागदागिने तिच्या आठवणी, संपत्ती, स्त्रीधन आणि आयुष्यभराची कमाई असे टप्पे ओलांडून, तिला आजन्म सोबत (काही सन्माननीय अपवाद वगळता) करतात. दुसरी बाजू संपत्तीची हाव असलेल्यांच्या कुजकट विचारांची, त्यातून मागितल्या जाणाऱ्या हुंड्याची, हुंडाबळींची अशी काळवंडलेली असते. कळत नकळत हे दागिने स्त्रीच्या ‘स्टेटस’चा मापदंड बनतात आणि सुरुवात होते अतर्क्य खेळाची! तर, दुसरीकडे दागिन्याच्या डिझाईनमध्ये बदल करून, स्वत:च्या रक्षणासाठी तो गळ्यात घालावा लागतोय. दोन्हीकडे बदलतायत महिलाच!
ती सजते तेव्हा फक्त शरीर नव्हे तर, तिच्या भावनाही तेजाळतात. सोन्याची कर्णफुले, पाटल्या, मोत्यांची नाजूक माळ असा प्रत्येक दागिना तिच्या मनातील आनंदाचा, ममत्वाचा, स्त्रीत्वाचा आणि अभिमानाचा प्रतिबिंब असतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेले गळ्यातील साखळी-गोफ, त्याच्या आठवणीची नाजूक अंगठी, लग्नात मिळालेली मंगळसूत्राची माया, बाळंतपणात दिलेली सोन्याची वाळी...काय आणि किती सांगावं! प्रत्येक दागिन्यात तिच्या स्मृती दडलेल्या असतात. चमकणाऱ्या मण्यांमध्ये तिचे हसू असते तर बांगड्यांच्या किणकिणाटात तिचा आत्मविश्वास! मात्र, आज स्त्रीच्या सौंदर्याचा अभिमान असलेला गळाच तिच्यासाठी स्वरक्षणाचं शस्त्र बनला आहे. याला कारण आहे बिबट्या! वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागासह नाशिकच्या काही भागांत सध्या बिबट्यांचा वावर अधिक दिसून येत आहेत. सतत होत असलेले हल्ले आता भीतीदायक झाले आहेत. शेतमजुरी करणाऱ्या महिला जेव्हा शेतीकडे पाऊल टाकतात, तेव्हा त्यांचा सावलीसारखा पाठलाग करत असते बिबट्याची भीती! अचानक हल्ला चढवत नरडीचा घोट घेणाऱ्या या बिबट्यांपासून स्वरक्षण व्हावे म्हणून आता महिलांनी आत्मरक्षणाशी निगडित नवा ‘देशी जुगाड’ अवलंबला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी पारंपरिक दागिन्यांची आवड बाजूला ठेवली आहे. हा उपाय म्हणजे गळ्याभोवती काटेरी खिळ्यांचा पट्टा! कुत्र्याच्या गळ्यात असतो तसा! थोडक्यात, सोन्याचांदीचे दागिने काढून आता लोखंडी ‘खिळ्यांचा हार’ त्यांच्या गळ्यात दिसतो आहे. जिथे दागिने चमकून ऐश्वर्याचं प्रदर्शन करतात, तिथे हा पट्टा त्यांना जगण्याची खात्री देतोय.
महाराष्ट्रात सध्या वाघ आणि बिबट यांची वाढलेली संख्या, त्यांचा मानवी वस्तीतील वावर आणि पर्यायाने होणारा संघर्ष आता नित्याचा झाला आहे. अशातच राज्यातील ऊस लागवडीच्या मुख्य प्रदेशांमध्ये म्हणजे पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये बिबट्यांच्या हालचाली घाबरविणाऱ्या आहेत. या परिसरात ऊसाचे मळे आणि जंगल जवळपास असल्याने संकट गडद झालं आहे. नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून जगत असताना शेतीत काम करणं, बाहेर फिरणं किंवा मुलांना शाळेत पाठवणंही धोक्याचं झालंय. बिबट्यांपासून बचावासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात असतानाच, महिनाभरापूर्वी कुत्र्यावर बिबट्याने चढवलेला हल्ला कुत्र्याच्या गळ्यात असलेल्या पट्ट्यामुळे निष्फळ ठरला. यावरून या लोखंडी खिळ्यांच्या पट्ट्याचा आविष्कार झाला. कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यामुळे बिबट्याचा हल्ला अपयशी ठरल्याचे पाहिल्यानंतर तेथील महिलांना स्वरक्षणाची वेगळी कल्पना सुचली. ‘बिबट्यापासून कुत्रा वाचला तर आपण का नाही?’ असा साधा पण, ठाम प्रश्न त्यांनी स्वतःलाच केला आणि त्या क्षणी जन्माला आला लोखंडी खिळ्यांनी सजवलेला गळपट्टा! गळ्यातील मंगळसूत्र आणि बोरमाळा काढून, पितळी घुंगरू-काटेरी पट्टा गळ्यात बांधण्याच्या या कल्पनेत धैर्य आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम होता.leopards-women बिबट झडप घालून मानगूट पकडतो आणि नरड्याचा घोट घेतो हे जाणून, त्यांनी मानेला पूर्ण झाकणारा जाड पट्टा तयार केला. त्याभोवती टोकदार खिळ्यांची रचना आहे. बिबट्याने मान धरताच खिळे त्याच्या जबड्यात टोचणार आणि आपली सुटका होणार, या आत्मविश्वासाने या महिला शेतमजुरीवर जाऊ लागल्या आहेत. आता हा गळपट्टा संरक्षणासोबतच महिलांच्या हुशारी, धाडस आणि सर्जनशीलतेची जीवंत साक्ष बनला आहे.
बिबट्यांनी ऊस म शेतांना आपलं ‘नवीन जंगल’ बनवलं आहे. तिथे त्यांना उंदीर, बेडूक, घुशी, रानावनातील कुत्रे आणि कधीकधी माणूस अशी शिकार सहजपणे मिळते. ऊसाच्या जाड आणि उंच पिकात बिबटे सुरक्षित राहतात. या अनुकूल स्थितीने बिबट्यांच्या 2-3 पिढ्यांनी ऊस मळ्यातच जन्म घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एक मादी बिबट दरवर्षी सहा ते आठ पिल्लांना जन्म देते व ती सर्व ऊसाच्या मळ्यातच वाढतात, हे विशेष! वन विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 3,800 बिबटे असताना, फक्त पुणे जिल्ह्यातील ऊसमळ्यात दोन हजारांवर बिबट्यांची उपस्थिती असल्याचा अंदाज आहे. स्वतःची हद्द म्हणजे टेरिटरी असलेल्या बिबट्यांपेक्षा टेरिटरी नसलेल्या बिबट्यांकडून शिकार जास्त होते. सध्या पिंजरे लावून बिबट्यांना पकडलं जात असलं तरी बहुतांश वेळा पिंजऱ्यात मोठे बिबट अडकतात. परिणामी एक मोठं बिबट पकडलं गेलं तर त्याची जागा दोन ते अडीच वर्षांचे दोन बिबटे घेतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. जंगलातील धोका मोठा असला तरी महिलांची हुशारी त्याहूनही मोठी आहे. हीच भीती त्यांना आभूषणांपासून लोखंडी सुरक्षा कवचापर्यंत घेऊन आली आहे. हा बदल कठीण आहे, पण जिवापेक्षा मौल्यवान काय? आभूषणापासून आत्मरक्षणापर्यंतचा हा प्रवास सांगतो, भीती मोठी असली तरी, स्त्रीची जिद्द त्याहूनही भक्कम आहे. बिबट्याच्या काळापुढे पारंपरिक दागिन्यांची चमक हरवली असली तरी जगण्याची इच्छाशक्ती मात्र उजळून निघाली आहे.
दुसरीकडे, देशाच्या आणखी एका कोपऱ्यातही महिलांनी दागिने न घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागचं कारण वेगळंच आहे. आपले दागिने सामाजिक शांतता बिघडवून, आयाबहिणींवरील अत्याचाराचं कारण बनत असल्यावरून, उत्तराखंडच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी हा वेगळाच निर्णय घेतला आहे. बाजारात सोन्याच्या वाढत्या किमती बघता,‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या न्यायाने जौनसर बावर या आदिवासी भागातील गावकऱ्यांनी गावात सुखशांती राखण्यासाठी दागिन्यांच्या वापरावर मर्यादा घातली आहे. मात्र, महिलांशी संबंधित असलेला हा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या संमतीची कोणालाही गरज वाटली नाही. स्त्रीधनाच्या ‘निपटाऱ्याचा’ हा निर्णय महिलांच्या अनुपस्थितीत घेण्यात आला. कंदाद आणि इंद्रोली गावातील पुरुषांनी सोन्याच्या किमतींबद्दल चिंतीत होऊन एक सभा बोलावली. या वेळी लग्नाचे मुहूर्त निघू लागले होते आणि गावातील दोन कुटुंबांतील लग्नं देखील ठरलेली होती. सोनं खरेदी आपल्या आवाक्याबाहेर आहे याची पुरुषांना काळजी वाटत होती. असलेल्या दागिन्यांवरून आणि नव्या खरेदीवरून घरांमध्ये वाद सुरू झाले. दोन्ही गावांच्या पंचायत प्रमुखांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत पुरुषांनी एकमतानं, महिला यापुढं लग्न समारंभात फक्त तीन दागिनेच घालतील, असा निर्णय घेतला. त्यात नाकातली नथ, कानातलं आणि गळ्यातील मंगळसूत्र यांचाच समावेश असेल. कंदाद आणि इंद्रोली ही गावं उत्तराखंडच्या जौनसर बावर या आदिवासी प्रदेशाचा भाग आहेत.
कंदाद ग्रामसभेत, कंदाद आणि इंद्रोलीसह चार गावांचा समावेश होतो. इथं 65 पेक्षा अधिक कुटुंबं राहतात आणि मतदारांची संख्या सुमारे 650 आहे. परंपरेनुसार गावातील सभांमध्ये महिलांना सहभागी करून घेतलं जात नाही. या सभांना पुरुष मंडळीच येतात आणि तेच निर्णय घेतात. कोणी हा निर्णय अमान्य केला तर त्याला 50 हजार रुपये दंड भरावा लागतो.
कंदाद गावातील पुरुष या निर्णयावर आनंदी आहेत आणि या निर्णयामागील युक्तिवादाशी महिला नैराश्याने का होईना पण, सहमत आहेत. वर्ष 2000 मध्ये सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 5,000 रुपयांपेक्षा कमी होती. आता, 2025 मध्ये 10 ग्रॅमसाठी हा आकडा 1 लाख रुपयांच्या पुढं गेला आहे.leopards-women ज्या वेगानं सोन्याच्या किमती वाढल्या, त्या वेगानं या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं नाही. सोनं ही एक प्रकारची संपत्ती आहे, ज्याचा गरज पडल्यावर पुरुषही फायदा घेतात. महिलांचं स्त्रीधन म्हटल्या जाणाऱ्या या दागिन्यांचा महिलांच्या अस्तित्वाशी संबंध नाही. महिलांची खरी संपत्ती म्हणजे सोनं घालणं नसून त्यांचा आत्मविश्वास, शिक्षण, समाजातील त्यांचं स्थान आणि निर्णय घेण्याची शक्ती असल्याची मखलाशी ही पुरुषमंडळी करतात, अशी व्यंगात्मक टीका महिला खाजगीत करतात.
मात्र, गावात समानता आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे गावप्रमुख सांगतात. एखाद्यानं जर 10-20 लाखांचे दागिने खरेदी केले तर इतर कुटुंबांवरदेखील तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त दागिने खरेदी करण्यासाठी आपोआपच दबाव निर्माण होतो. यामुळे बरेच लोक आपली शेती विकत होते किंवा गहाण ठेवत होते. दागिन्यांसाठी जमीन विकावी लागत असेल तर काय उपयोग? असा गावकऱ्यांचा खराखुरा प्रश्न आहे. कंदार ग्रामसभेच्या आणखी दोन, बांगियासेद आणि संतोली या गावांनीही मर्यादित दागिन्यांचा हा निर्णय मान्य केला आहे. यासोबतच परिसरातील इतर गावंही सार्वजनिक सभा घेत आहेत आणि आपल्या गावात हा निर्णय लागू करत आहेत. चकराता तहसीलमधील खरसी गावानंही असा निर्णय घेतला आहे. मात्र, घरगुती भांडणं आणि खर्चामुळे जर दागिन्यांवर मर्यादा येत असेल तर दारूवर का नाही? अशी मागणी करणाऱ्यां महिलांचा आवाज आजही दबलेलाच आहे, हे मात्र नक्की!