नया अकोला अभिवादन यात्रा नवी ओळख

06 Dec 2025 19:47:57
अमरावती, 
mukul-wasnik : नया अकोला येथील ही यात्रा केवळ एक सोहळा नसून, ही आंबेडकरी चळवळीच्या जागृतीची नवी ओळख आणि अस्तित्वाची खूण आहे. या ऐतिहासिक स्मारकाचे जतन करण्यासाठी आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व खासदार मुकुल वासनिक यांनी केले.
 
 
JK
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘श्रद्धाभूमी’ नया अकोला (वलगाव-चांदूर बाजार रोड) येथील स्मारकावर शनिवारी भीमअनुयायांचा जनसागर लोटला. राज्याच्या माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून सलग तिसर्‍या वर्षी या अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथे पहाटेपासूनच ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या घोषणेने आणि निळ्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘आंबेडकरी साहित्य दालन’. केवळ पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा पुस्तकांकडे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा कल जास्त दिसून आला. अनेक युवकांनी संविधानावर आणि समाजपरिवर्तनावर आधारित पुस्तके खरेदी करून ‘वाचाल तर वाचाल’ या संदेशाचे पालन केले. नया अकोला येथील या भूमीत डॉ. आंबेडकरांच्या अस्थी जतन केलेल्या आहेत, या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी उपस्थित जनसमुदायाने एकमुखाने मागणी केली. स्मारकाची अधिकृत नोंदणी आणि शासकीय स्तरावर विकासासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
 
अभिवादन कार्यक्रमाला खा. बळवंत वानखडे, काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, विरेंद्र जगताप, प्रदेश उपाध्यक्ष सुनील देशमुख, प्रदेश सचिव हरीभाऊ मोहोड, अमरावती शहर अध्यक्ष बबलू शेखावत, बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रवीण मनोहर, जयश्री वानखडे, दिलीप काळबांडे, भारत ढोणे, श्रीकांत बोंडे, श्याम बेलसरे, अमित गावंडे, वैभव वानखडे, प्रतिभा गौरखेडे, प्रिया विघ्ने, शरद वानखेडे यांच्यसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
Powered By Sangraha 9.0