आता जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा

06 Dec 2025 19:15:20
वर्धा, 
dairy-development-project : ग्रामीण भागातील पशुपालकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत दुग्ध उत्पादन व्यवसायाला मोठी चालणा दिली जाणार आहे.
 
 
 
संग्रहित फोटो
 
 
 
महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांची दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ च्या अंमलबजावणीसाठी निवड केली आहे. यात प्रामुख्याने वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. सन २०२५-२६ ते २०२८-२९ या कालावधीत या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाणार आहे. संबंधित प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुपालकांची आर्थिक उन्नतीच साधली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने ५० टके अनुदानावर उच्च दुध उत्पादन क्षमता असलेली १ गाय/म्हैस लाभार्थ्याला दिली जाणार आहे. तर ७५ टके अनुदानावर उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणाचे प्रत्यारोपण केलेली गाभण कालवडही लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. तर २५ टके अनुदानावर प्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा, २५ टके अनुदानावर फॅट व एसएनएफ वर्धक खाद्याचा पुरवठा, ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र, १०० टके अनुदानावर बहुवार्षिक चार पिके/थांबे, २५ टक्के अनुदानावर मुरघासचा पुरवठा लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.
 
 
दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ च्या अंमलबजावणीसाठी वर्धा जिल्ह्याची निवड शासनाने केली आहे. सन २०२५-२६ ते २०२८-२९ या कालावधीत विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देत ग्रामीण भागातील पशुपालकांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे. दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत येणार्‍या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावा. कुठलीही अडचण असल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकार्‍यांशी भेट घेत अधिकची माहिती जाणून घ्यावी, असे जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. जगदीश बुकतरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0