सूर्याची मुंबईत बादशाही! टी-२०मध्ये सर्वाधिक धावांचा नवा विक्रम

06 Dec 2025 09:38:27
मुंबई,
surya supreme in Mumbai भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना केरळविरुद्ध फक्त ३२ धावा करतानाच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून नंबर १ स्थान पटकावले. या सामन्यातील धावांनंतर त्याच्या खात्यात एकूण १७१७ धावा जमा झाल्या असून त्याने आदित्य तरेचा १७१३ धावांचा विक्रम मागे टाकला आहे.
 
 

suryakumar yadav 
सूर्यकुमार २०१० पासून मुंबईसाठी टी-२० क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत ७१ सामन्यांत नऊ अर्धशतके आणि तब्बल ६४ षटकारांसह आपली स्फोटक फलंदाजी सिद्ध केली आहे. कोणत्याही गोलंदाजीवर वर्चस्व गाजवणाऱ्या त्याच्या शैलीमुळे तो भारतीय टी-२० संघाचा विश्वासाचा आधार बनला आहे. दरम्यान, केरळ आणि मुंबई यांच्यातील सामन्यात केरळने प्रथम फलंदाजी करत १७८ धावांचा टप्पा गाठला. संजू सॅमसनच्या ४६ धावा, विष्णू विनोदच्या ४३ धावा आणि शेवटी सैफुद्दीनच्या फटकेबाज १५ चेंडूत ३५ धावांमुळे केरळने मजबूत धावसंख्या उभी केली.
 
 
उत्तर फटक्यात मुंबईकडून सरफराज खानने ५२ धावांची चांगली खेळी केली, मात्र इतर फलंदाज अपेक्षेनुसार खेळू शकले नाहीत. अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ३२ धावा केल्या. पण कर्णधार शार्दुल ठाकूर खातेही उघडू शकला नाही, तर शिवम दुबे फक्त ११ धावांवर बाद झाला. परिणामी, मुंबईचा संपूर्ण संघ १६३ धावांपर्यंतच पोहोचला आणि सामना १५ धावांनी गमावला. सामन्याचा निकाल काहीही असो, सूर्यकुमार यादवने मिळवलेले हे नंबर १ स्थान आणि तोडलेला विक्रम त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पुन्हा एकदा साक्ष देतात.
Powered By Sangraha 9.0