उमरखेडमध्ये वाहतूक शिस्तीस मोठी चालना

06 Dec 2025 20:06:17
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
umarkheed-traffic : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा उमरखेडतर्फे गेल्या दोन दिवसांपासून व्यापक कारवाईला वेग आला आहे. गायत्री चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर तसेच पुसद मार्गावरील हातगाड्या व अनधिकृतरीत्या उभ्या केलेल्या वाहनांवर कठोर कार्यवाही करण्यात आली.
 
 
 
y6Dec-TRaffic
 
 
 
वाहतूक पोलिस निरीक्षक अमोल गुंडे यांनी नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत उमरखेडकरांना अडथळेमुक्त रस्ते देण्यासाठी सातत्याने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार शुक्रवारी संपूर्ण शहरातील रस्त्यांनी अक्षरशः ‘मोकळा श्वास’ घेतला. फळविक्रेते आणि फेरीवाल्यांना योग्य तंबी देण्यात आली असून अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंड आकारण्यात आला.
 
 
विशेष म्हणजे शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिस उपस्थित राहतील, या आश्वासनाची पूर्तता करत स्वतः अमोल गुंडे शाळांच्या परिसरात हजर राहिले. त्यांच्या या पुढाकाराचे शहरभरातून कौतुक होत असून नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
 
 
वाहतूक व्यवस्थेत शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पुढील काळात नियम आणखी कडक करण्यात येतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मोहिमेत उमरखेडमधील सर्व नागरिक, व्यापारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0