समुद्रपूर,
agriculture-offices-rent : शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर खडसे यांच्या घरी किरायाने सुरू आहे. मात्र, गेल्या ७ महिन्यांपासून किराया मिळाला नसल्याने घरमालक खडसे यांनी ९ डिसेंबरपर्यंत थकित असलेले १ लाख २० हजार रुपये भाडे द्या, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

सुधीर खडसे यांचे घर कृषी विभागाने किरायाने घेतले असून याठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार चालविल्या जात आहे. मात्र, त्यांना २०२५ मध्ये ७ महिन्यांचे भाडे १ लाख २० हजार रुपये आजतागायत मिळालेले नाही. अनेकवेळा कार्यालयात चकरा मारूनही उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, ८ डिसेंबर २०२५ पर्यंत भाडे देण्यात यावे, अन्यथा ९ डिसेंबर रोजी कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. मला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका, मी आजारी असल्याने पैशांची नितांत गरज आहे, असेही खडसे यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, तहसीलदार समुद्रपूर, ठाणेदार समुद्रपूर यांना पाठविल्या आहेत.