देवळी फेज-२ उद्योगांना नवी चालना देणारा : आ. बकाने

07 Dec 2025 19:49:40
देवळी, 
rajesh-bakane : देवळी-पुलगाव परिसरात गुंजखेडा येथे नवीन देवळी फेज-२ औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर जलद गतीने होत असून देवळी फेज-२ उद्योगांना नवी चालना देणारा निर्णय प्रत्यक्षात येत असल्याची माहिती आमदार राजेश बकाने यांनी त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
JIK
 
 
आ. बकाने यांनी १५ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाला मुख्यमंत्र्यानी प्रतिसाद देत उद्योग विभागाला तपासणीचे निर्देश दिले. त्यानंतर एमआयडीसीच्या भूसंपादन महाव्यवस्थापकांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी वर्धा जिल्हा प्रशासनाला सलग उपलब्ध सरकारी व खाजगी जमिनींची माहिती, सातबारा उतारे व गाव नकाशासह सविस्तर अहवाल मागविला. हा अहवाल मिळताच एमआयडीसीचे अधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार असून देवळी फेज-२ चा औद्योगिक क्षेत्राचा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार असल्याची माहितीही आ. बकाने यांनी यावेळी दिली.
 
 
आमदार बकाने पुढे म्हणाले, देवळी-पुलगाव परिसराचा औद्योगिक चेहरामोहरा बदलणे हे आपले प्राधान्य असून युवकांना रोजगार देणारी मजबूत पायाभरणी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि परिसरात उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करणे या दिशेने सतत पाठपुरावा केला. आज त्याचे फलित दिसू लागले आहे. नव्या औद्योगिक वसाहतीमुळे वर्धा जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर पुलगाव-देवळीचा ठसा उमटणार असून मोठ्या प्रमाणात स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. एमआयडीसी व मुख्यमंत्री कार्यालय या दोन्ही पातळ्यांवरून मिळणारी हालचाल ही स्थानिकांसाठी नवा आशेचा किरण असल्याचेही आमदार बकाने यांनी नमूद केले.
 
 
येणार्‍या अल्प काळातच शासन स्तरावरून प्रक्रिया पूर्ण होऊन वसाहतीतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यासह क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास आ. बकाने यांनी व्यत केला.
Powered By Sangraha 9.0