अन्नसाखळी टिकविण्यासाठी पक्षी गरजेचे : दीपक गुढेकर

07 Dec 2025 19:23:28
वर्धा, 
deepak-gudhekar : आपल्या परिसरातील पक्षी अन्नसाखळी टिकवून ठेवत मानवाला लागणार्‍या धान्यनिर्मितीसाठी मदत करतात. पर्यावरणात पक्ष्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन बालपंचायतीच्या उपक्रमात बहार नेचर फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक गुढेकर यांनी केले.
 
 
 
H
 
 
 
मिशन समृद्धीद्वारे बहारच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध गावात बालपंचायत पक्षी निरीक्षण संमेलन घेण्यात आले. या संमेलनात बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सचिव जयंत सबाने, मार्गदर्शक अतुल शर्मा, मिशन समृद्धीचे किशोर जगताप, निवास उरकुडे यांनीही मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून पक्ष्यांबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली.
 
 
 
पक्षी आपले अन्न व अधिवासासाठी स्वतःच प्रयत्नशील राहत असल्याने मानवाने त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. उलट आपल्यामुळे पक्ष्यांना कोणतीही इजा होणार नाही तसेच त्यांचे अधिवास सुरक्षित राहतील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन या अभ्यासकांनी बालपंचायतीत सहभागी मुलामुलींना केले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना चित्र प्रदर्शनातून तसेच त्यांच्या गावालगतच्या तलाव, धरण, पाणवठे, शेतशिवार, झुडपी जंगल या अधिवासात नेऊन पक्षीओळख करून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण करीत त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद आपल्या वहीत केली. पक्ष्यांचे हवेत विहरणे, चित्तवेधक झेप, त्यांचा चिवचिवाट, भक्ष्य पकडण्याची पद्धत, संकट प्रसंगी होणारी हालचाल अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.
 
 
गाव विकासाच्या नऊ संकल्पनेतील बालस्नेही ग्रामपंचायत अंतर्गत मिशन समृद्धीतर्फे जिल्ह्यातील १२ गावात बालपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. यात चिखली येथे २६, तर दहेगाव गोंडी, पाचोड व शिवणफळ येथे प्रत्येकी १६ प्रकारच्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. या चार ठिकाणी आयोजित संमेलनात परिसरातील १५ गावांमधील २५५ मुलामुलींचा सक्रिय सहभाग होता. या उपक्रमात पाचोड येथे मंगेश लोडम, ममता दोडके, अर्चना लांडगे, संजय दोडके, पराग बिसन, चिखली येथे अतुल नाईक, संगीता बेलमकर, शुभांगी फुलझेले, सविता कुमरे, वनिता ढोणे, रसिका गावंडे, आशिष बेलमकर, प्रवीण येनुरकर, दहेगाव गोंडी येथे शीतल मांडगावकर, विक्रम बोरकर तर शिवणफळ येथे अक्षय देशमुख, सीमा परचाके, पुष्पा पुरके या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. चारही ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व संचालन बालपंचायतींच्या बाल सदस्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0