प्रासंगिक. . .
वैभव डांगे
gdp growth rate भारताचा अलिकडचा त्रैमासिक जीडीपी आकडा- सरकारी अंदाजानुसार 8 टक्क्यांपेक्षा जास्त- पुन्हा एकदा जागतिक निराशावाद्यांना सौम्य पण स्पष्ट संदेश देतो. भारताची अर्थव्यवस्था मेल्याची अफवा फारच अतिशयोक्त होती. जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या काठावर चालल्या असताना आणि भू-राजकीय अनिश्चितता जागतिक व्यापारात धुंदी माजवत असताना, भारताने केवळ वाढीचा वेग कायम ठेवला नाही, तर त्यात थोडेसे ‘टर्बोचार्जर’ही बसवले आहे.
या वाढीच्या केंद्रस्थानी आहे सरकारचा अविरत पायाभूत सुविधांवरील भर. अलिकडच्या बजेटमध्ये सार्वजनिक भांडवली खर्चात 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेत स्पष्टपणे दिसतो. राज्यांमध्ये धावणारे नवे महामार्ग, नवीन विमानतळ, रेल्वे आधुनिकीकरणाची विक्रमी गती, बंदर क्षमता वाढ आणि मालवाहतूक मार्गांचे जाळे- यांनी बांधकाम, लॉजिस्टिक्स आणि संबंधित क्षेत्रांना नवसंजीवनी दिली आहे. जागतिक पुरवठा शृंखला आजकाल थोड्या संवेदनशील किशोरवयीन मुलांप्रमाणे- अनपेक्षित, भावनिक आणि लवकर बिघडणाऱ्या वागत असताना भारताचा देशांतर्गत कॅपेक्सचक्र म्हणजे घरातील समजूतदार वडिलधारी व्यक्तीच ठरला आहे.
उत्पादनक्षेत्रानेही या तिमाहीत उत्तम कामगिरी केली. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो आणि फार्मा या क्षेत्रांच्या जोरावर उत्पादन क्षेत्रातील जीव्हीएङ्क्ष वाढ चांगली राहिली. 2 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या पीएलआय योजनांनी कंपन्यांना उत्पादन वाढवण्यास प्रवृत्त केले आहे आणि जागतिक पुरवठा साखळीचे विविधीकरण भारताच्या बाजूने जोर धरत आहे. कारखान्यांमध्ये आता मंत्री येणार म्हणूनच दिवे लागतात असे नाही- खरंच काम सुरू आहे. क्षमता वापर 74 टक्क्यांच्या वर गेला असून वस्तूंच्या किमती कमी झाल्याने उद्योगांना दिलासा मिळाला आहे.
आणि मग, जीएसटी सुधारांचा परिणाम. एकेकाळी जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोसळेल असे भाकीत करणाèया टीकाकारांना आता थोडे गोंधळायला झाले आहे. कारण अलिकडील जीएसटी दरकपातींमुळे-विशेषत: जीवनावश्यक आणि सर्वसामान्य वापराच्या वस्तूंवरील-उपभोगाला चांगला हातभार लागला.gdp growth rate आज महिन्याला सरासरी 1.6-1.7 लाख कोटी रु. जीएसटी संकलन होत आहे. कमी दर, अधिक अनुपालन आणि वाढलेला महसूल-ही समीकरणे आजही काहींना क्वांटम फिजिक्ससारखीच गुंतागुंतीची वाटतात.
या दमदार त्रैमासिक आकड्यांचा वार्षिक वाढ दरावरही सकारात्मक परिणाम होणारच. उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वेग टिकून आहे आणि सरकारी कॅपेक्स सतत वाढत असल्याने वर्षभराचा वाढ दर 6.8 टक्के ते 7.2 टक्क्यांच्या मजबूत पट्ट्यात राहू शकतो. जगाच्या तुलनेत हे फक्त चांगलेच नाही-थेट ‘अॅथलेटिक’ आहे. अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणांचा विचार करता ही आर्थिक कामगिरी भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या आणखी फायदेशीर आहे. सक्षम देशांतर्गत अर्थव्यवस्था भारताला व्यापार चर्चेत आत्मविश्वास देते. उत्पादनक्षेत्रातील वाढ भारताला जागतिक पुरवठा शृंखलेत विश्वसनीय ‘बॅकअप प्लॅन’ बनवते-जे अमेरिकेलाही हवे आहे. आणि मजबूत करसंकलनामुळे भारत व्यापार वादात दयाभाव मागणारा देश न राहता, समोरासमोर बोलणारा देश बनतो. ज्यांनी भारताची अर्थव्यवस्था संपली अशी घोषणा केली होती, ते आता शांतपणे विचार करत आहेत की मृत अर्थव्यवस्था सतत जगातील सर्वांत जास्त वाढ दर कसा काय दाखवते? कदाचित अर्थव्यवस्थेने त्यांचे अहवाल वाचलेच नसतील. कदाचित ती ‘निराशावाद’ नावाची भाषा बोलतच नसेल. एकूणच, या तिमाहीचे जीडीपी आकडे फक्त वाढ दाखवत नाहीत-ती वाढ कशी, कुठून आणि किती रणनीतीने मिळते हेही दाखवतात. पायाभूत सुविधांवरील खर्चाने कणा मजबूत केला, उत्पादनक्षेत्राने स्नायू वाढवले, जीएसटी सुधारांनी रक्ताभिसरण सुरळीत केले आणि भू-राजकीय चातुर्याने शरीर पूर्ण तंदुरुस्त ठेवले.
भारताची अर्थव्यवस्था फक्त जिवंत नाही- ती धावत आहे, स्ट्रेचिंग करत आहे आणि वेळोवेळी स्प्रिंटही मारत आहे. आणि ज्यांनी तिचा मृत्युलेख आधीच लिहून ठेवला आहे, त्यांच्यासाठी ही तिमाही एक छोटासा सल्ला देते : मसुदा पुन्हा एकदा वाचा.
संस्थापक व संचालक, बिल्ड इंडिया फाऊंडेशन
(सार्वजनिक धोरण तज्ज्ञ)