दिनेश गुणे
role illusion केवळ राजकारणातच नव्हे आणि केवळ राज्य किंवा देशातच नव्हे, तर जगभरातील कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहिले की एक गोष्ट नक्की पटते, ती म्हणजे, काळ मोठा कठीण आला आहे. इंग्लंड-अमेरिकेतील एखादी राजकीय उलथापालथ असो, एखाद्या देशात सुरू झालेली आणि शमलेली जेन-झी नावाच्या नव्या पिढीची नवआंदोलने असोत, एखाद्या देशात कोणा माथेफिरूने एखाद्या शाळेत, मॉलमध्ये किंवा भर रस्त्यात बेछूट गोळीबार करून निष्पापांचे क्रूर बळी घेणे असो, शेजारच्या श्रीलंकेतील किंवा बांगलादेशातील भयावह राजकीय समस्या असोत, रशिया-युक्रेन महायुद्ध असो किंवा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला आणि राजकारणाला दररोज मिळणारे नवे कंगोरे असोत. ‘आपण बरे की आपले कुटुंब बरे’ किंवा, ‘माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी’ असे समजून सामान्य ज्ञानात भर घालण्यापुरतेच या प्रश्नांकडे पाहायचे ठरविले, तरी या सर्वांचा एकएकटा किंवा एकत्रित फटका थेट प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतच असतो. महागाई, बेरोजगारी, अशा प्रश्नांचे वेढे आणखीनच घट्ट आवळायला लागतात.

चहुबाजूंना समस्या, प्रश्न आणि प्रश्नांचाच महापूर आहे आणि सारे जण संभ्रमात सापडले आहेत. अशा समस्याग्रस्त वातावरणात एखाद्या प्रश्नावर बोलावे की न बोलावे असेही काहीसे शंकेचे काहूर सर्वांच्या मनात सुरू आहे. बोलावे तर काय बोलावे, बोलायचे तर कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात बोलावे, न बोलावे तर कोणत्या प्रश्नावर न बोलावे किंवा मौनच बाळगावे हे समजणेही कठीण झाल्यामुळे, कोणत्या प्रश्नावर बोलावे, काय बोलावे अथवा कोणत्या प्रश्नावर काहीच न बोलता गप्प राहावे हे समजून घेण्यासाठीदेखील ‘जाणकारां’कडेच अपेक्षेने पाहावे लागते. असे जाणकार मोजकेच असतात. कोणत्या प्रश्नावर कोणी कोणती भूमिका घ्यावी, याविषयी ते वारंवार मार्गदर्शन करत असतात. अर्थात, त्यांच्या मार्गदर्शनास मोठे महत्त्वही असते. तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांच्या बाबतीत, कोणत्याही प्रश्नावर आपण आपल्याच मनाचा आवाज ऐकून अगदी प्रामाणिक भावनेने घेतलेली कोणतीही भूमिकादेखील बरोबरच असेल असे नाही असे वाटते आणि त्या भूमिकेवरील इतरांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण ती फार तर कुटुंबासमोर व्यक्त करतो. त्यावर इतरांकडून जेव्हा नापसंतीच्या भावना व्यक्त होतात, कधीकधी थेट खिल्ली उडविली जाते किंवा नाके मुरडली जातात, तेव्हा आपल्याच त्या भूमिकेस मुरडही घालून गप्पदेखील बसतो. या प्रक्रियेत, भूमिका घेणे, त्यावर व्यक्त होणे आणि इतरांस ती पटत नाही असे स्पष्ट झाल्यास गप्प बसणे या सर्व कृती म्हणजे त्या त्या प्रसंगानुसार घेतल्या जाणाèया भूमिकाच असतात. आपली एखादी भूमिका कुटुंबातील सर्वांस पसंत पडली, तर मिळणाèया नैतिक पाठिंब्याच्या जोरावर ती आपण कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर, लोकल ट्रेनमधील सहप्रवाशांसमोर मांडतो आणि प्रवास संपेपर्यंत त्यावर घमासान चर्चादेखील घडवितो. त्यामुळे वाढणाऱ्या उत्साहाचा परिपाक म्हणजे, पुढे तीच भूमिका ट्विटर, इन्स्टा, फेसबुकसारख्या समाजमाध्यमावरही मांडतो. त्यावरील प्रतिक्रिया अजमावत राहतो. कधी उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडतो, कधी चवताळलेले विरोधक आक्रमकपणे ट्रोलदेखील करतात, तर कधी कुणीच काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण टीका करणे, आरोप करणे, नाराजी व्यक्त करणे किंवा कोणतीही प्रतिक्रिया देणे आणि कोणतीच प्रतिक्रिया न देता केवळ गप्प राहणे हीदेखील ज्याची त्याची भूमिकाच असते. म्हणूनच, आजकाल भूमिका हा केवळ वैयक्तिक मुद्दा न राहता, सामाजिक विषय झाला आहे. राजकारणातच नव्हे, समाजकारणात आणि कुटुंबकारणातही भूमिका घेणाऱ्याची किंवा न घेणाऱ्याची भूमिका व तसे करण्यामागची त्याची भूमिका हा अनेकांच्या औत्सुक्याचा मुद्दा ठरू पाहातो, तो त्यामुळेच!
म्हणूनच, भूमिका हा स्वत:च एक मोठा गमतीदार शब्द आहे. या शब्दाची आणि भूमिकेची असंख्य रूपे असतात. काही वेळा तर, गप्प बसणे हीदेखील एक भूमिकाच असते, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. भूमिकेचे दुसरे रूप म्हणजे, जाणकाराच्या भूमिकेत जाऊन, इतरांना भूमिका घेण्याचा सल्ला देणे हे होय! असे केल्याने, एखाद्या विषयावरील स्वत:ची भूमिका मांडली नाही, तरीही जाणकार म्हणून अल्पावधीत मान्यता मिळू शकते. असे जाणकार असा सल्ला कोणत्याही क्षेत्रातील कोणाही व्यक्तीस, समूहास अथवा थेट सरकारासही देऊ शकतात. ‘एखाद्या प्रश्नावर गप्प राहू नका, भूमिका घ्या’, असा सल्ला जगातील कोणत्याही सरकारला किंवा नेत्याला देण्यामागेही ‘सल्लागाराची भूमिका’च असते. एखाद्या प्रश्नावर सल्लागाराने बजावलेली अशी भूमिकाही मोलाची ठरत असते. समाज माध्यमांवरील एखाद्या वादात उड्या घेऊन अनेक जण हिरीरिने आपापल्या भूमिका मांडताना अलिकडे दिसतात. या भूमिकांतून त्या त्या व्यक्तीच्या विचारांची ओळख होते आणि त्याच्यावर एक विशिष्ट शिक्काही बसतो. हा शिक्का त्याच्या राजकीय विचारसरणीची खिल्ली उडविणारा असतो, कधी अशाच भूमिकांमुळे समविचारी समाज-माध्यमकर्मींचे कोंडाळे तयार होऊन एक आभासी मंचावरील आभासी संघटितपणाचेही दर्शन घडते आणि अशा झुंडी विरोधी विचारांच्या कोणत्याही अशाच संघटितांवरही आक्रमकपणे हल्ले करू लागताना दिसतात. मग ते हल्ले परतवून लावण्यासाठी समोरची समविचारींची झुंड आक्रमकपणे दंड थोपटून शब्दयुद्धास तयार होते आणि समाज माध्यमांचे मंच म्हणजे विचारांची रणभूमी होते.
साहित्यिक हा समाजमनाचा आरसा असतो. तसे चित्रकार, पत्रकार, व्यंगचित्रकार असे अनेक जण समाजमनाचेच आरसे असतात. त्यामुळे या सर्वांनीच सध्याच्या काळात कोणती ना कोणती भूमिका घेणे गरजेचेच आहे. विशेषत:, कोणत्याही विषयावरील माध्यमांच्या भूमिकेकडे समाजाचे लक्ष लागलेले असते. कारण त्यातूनच, समाजातील अन्य घटकांची भूमिका तयार होत असते. हे लक्षात घेता, या सर्वांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे हे योग्यच असते. पण बèयाचदा, यातील अनेक जण गप्प बसण्याचीच भूमिका घेतात, तेव्हा या लोकांना भूमिका घ्या असे बजावण्याची भूमिका अशा जाणकारांनाच वठवावी लागते. कोणती भूमिका घ्यावी हा मात्र, प्रत्येकाचा आपापला विषय असतो.role illusion कोणताही समंजस माणूस समाजाने, नेत्याने किंवा देशाने कोणत्याही प्रश्नावर, म्हणजे, आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा नैमित्तिक यापैकी कशावरही, कोणती भूमिका घ्यावी असा सल्ला कधीच कुणाच्या माथी मारत नसतो. आपली भूमिका न मांडता, ‘भूमिका घ्या’ असा सल्ला देण्याची भूमिका बजावणाèया अशा जाणकारांकडे नेहमी सोबत एक ‘गुलदस्ता’ असतो. आपली भूमिका या गुलदस्त्यात (ताजी) राहील याची काळजी घेणे हीदेखील एक ‘प्रासंगिक भूमिका’च असते... असा प्रकार विशेषतः राजकारणात दिसतो. कारण, राजकारणातील कोणावरही कोणत्याही प्रश्नावरील एखाद्या भूमिकेत सातत्य राखण्याचे बंधनकारक नसते. उलट, त्या त्या वेळी, त्या त्या परिस्थितीनुरूप विचार करून प्रासंगिक भूमिका घेणारेच यशस्वी ठरतात, असेही दिसून येते. कारण, जनतेची, म्हणजे समाजाची स्मरणशक्ती अल्पजीवी असते यावर राजकारणाचा नितांत विश्वास असतो. जनतादेखील कधीकधी त्या विश्वासास बळ देणारी भूमिका घेत असते. तीदेखील बहुतांश वेळा प्रासंगिकही असते. राजकारणातही आभासी मंचावरील झुंडींप्रमाणे, प्रत्यक्ष समविचारी म्हणविणाèयांच्या झुंडीदेखील असतात. त्या झुंडी ज्या कोणाकडे आपला नेता म्हणून पाहात असतात, त्याची भूमिका ही त्या झुंडींची भूमिका असते. त्यामुळे, एखाद्या राजकीय पक्षाचा निष्ठावंत किंवा अनुयायी किंवा मतदार म्हणविणाऱ्यास त्याची स्वत:ची भूमिका ठरविण्याचे मानसिक दडपण सहसा येत नाही. आपण ज्या नेत्याच्या भूमिकेस पाठिंबा देतो, त्या नेत्याची प्रासंगिक भूमिका ही त्या त्या वेळी त्या अनुयायांची भूमिका असते. असे झाल्याने, आपल्या नेत्याची अगोदरची भूमिका कोणती होती आणि आता प्रसंगानुसार त्याने घेतलेली नवी भूमिका कोणती याचा विचार करण्याचे कष्ट घेण्याची त्यास कधी गरज भासत नाही.
अशा प्रासंगिक भूमिका घेण्यात महाराष्ट्राचे राजकारण वाकबगार आहे. राज्यातील काही नेत्यांनी प्रासंगिक भूमिका घेतच राजकारणात अनेक दशकांच्या वाटचालीचे टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत. तर काही नेत्यांना आपली स्वत:ची कोणतीच भूमिका न घेता, समोर येणाèया परिस्थितीनुसार कोणत्याही वेळी कोणतीही भूमिका घेण्यातच आनंद वाटतो. विशेष म्हणजे, ठाम भूमिका, स्पष्ट विचार आणि योग्य राजनीती या त्रिसूत्रीनुसार एका विचाराशी बांधिलकी मानून त्या विचाराशी सुसंगत अशी भूमिका घेणाèयापेक्षाही, प्रासंगिक भूमिका घेत वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेत पाठ फिरविणाऱ्याच्या भूमिकेचे अधिक कौतुक होते. गेल्या दशकभराच्या राजकारणाकडे पाहिल्यास, अशा प्रासंगिक भूमिका घेणाऱ्याच्या राजकारणाचे सोने झाले असे म्हणता येते. आता नव्या राजकीय परिस्थितीनुसार नव्या भूमिका घेण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवून नवी भूमिका घेण्याचीही त्यांची तयारी असते. म्हणूनच, राजकारणातील अशा भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले दिसते. कोणतीही भूमिका न घेता गोंधळलेल्या मानसिकतेतून काहीतरी करत राहणे हीदेखील एखाद्याची भूमिकाच वाटावी एवढ्या बेमालूमपणे मानसिक गोंधळही साजरा करण्याची भूमिका घेणाèयांचेदेखील वारेमाप कौतुकही होताना दिसते.
मुळात, कोणत्याही प्रश्नावर काही ठाम भूमिका घेण्यासाठी, त्या संबंधित प्रश्नाची सखोल जाण असणे गरजेचे असते, यावर प्रासंगिक भूमिका घेणाèया कोणाचाही विश्वास नसतो. त्यामुळे, त्या त्या प्रसंगात आपण नेमके कोणत्या स्थानी आहोत, याचा विचार करून त्या स्थानाशी सुसंगत अशी भूमिका घेऊन प्रसंग साजरा करण्यावर त्यांचा भर असतो. आपल्याला साखरेच्या राजकारणातले काही कळत नाही, कारण साखरेचा आणि आमचा संबंध केवळ चहात वापरण्यापुरताच असतो असे सांगत महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकèयांच्या प्रश्नावर काहीच कळत नसल्याची प्रांजळ कबुली देऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही शेतकèयांची मने जिंकली होती. अर्थसंकल्पातले काही कळत नाही, सत्तेवर असताना अर्थसंकल्पाचे कौतुक करायचे आणि विरोधात असताना टीका करायची एवढेच आपल्याला माहीत आहे, असे सांगून त्यांनी प्रासंगिक भूमिका म्हणजे काय तेही दाखवून दिले होते. विशेषत:, 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या वादातून त्यांनी भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीत प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या वैचारिक भूमिकेतून केलेले संपूर्ण घूमजाव हा तर राजकीय कोलांटउडीचे ढळढळीत उदाहरणच ठरले. हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणे ही आपल्या पक्षाची चूक होती, अशी कबुली देत महाविकास आघाडीवर प्रभाव असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी जुळवून घेत उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतरही, 2022 मधील शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर नव्या परिस्थितीनुरूप नव्या भूमिका घेण्याची वेळ त्यांच्या राजकारणावर ओढवली आणि काही भूमिकांमुळे त्यांच्या राजकारणास माघार घेणेही भाग पडले. विधानसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा आणि जाहीर करा असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ठामपणे बजावणाèया ठाकरे यांच्या भूमिकेस काँग्रेस आणि शरद पवार यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही हे पाहून त्यांना त्या वेळी ती भूमिका गुंडाळणे भाग पडले होते. याच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर तिखट टीका केली तरीही आघाडीला तडा जाऊ नये अशी भूमिका घेत ठाकरे यांनी त्यावर मौन पाळण्याची भूमिका घेतली.
मौनाची भूमिका अनेकदा शाब्दिक भूमिकेहूनही प्रभावीपणे बोलकी ठरते, असे राजकारणात दिसते. एखाद्या प्रश्नावर कोणतीही एखादी स्पष्ट भूमिका घेतल्याने, धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी स्थिती ओढवण्याची शक्यता दिसत असेल, तर अनेकदा मौनाची भूमिका घेणे पसंत केले जाते. या मौनाच्या भूमिकेचे अनेक प्रकार असतात. सूचक मौन हा त्यापैकी सर्वांत सोपा आणि सर्वांच्या लक्षात येणारा प्रकार असतो. एखाद्या प्रश्नावर काहीच न बोलता मौन पाळले तर माध्यमांकडून त्यास सहसा सूचक मौन असे म्हटले जाते. या मौनाच्या भूमिकेमुळे अडचणीच्या प्रसंगातून सहीसलामत मोकळे होणे सोपे होते. काही वेळा मौनाच्या भूमिकेला हास्याची जोड दिली जाते. एखाद्या प्रश्नावर काहीच न बोलता केलेल्या केवळ सूचक हास्यातूनही भूमिका स्पष्ट होते आणि तरीही त्यापासून वेळप्रसंगी नामानिराळे होण्याचा मार्गही मोकळा ठेवता येतो. शरद पवार यांच्या भूमिका हा एक गमतीदार मुद्दा महाराष्ट्रात गेल्या पाच-सहा दशकांपासून चर्चिला जात असतो. त्यांच्या बदलत्या भूमिका हाच त्यांच्या राजकारणाचा गाभा आहे, असेही म्हटले जाते. कधी त्यांची भूमिका संभ्रमात टाकणारी वाटते, तर कधी त्यांच्या भूमिकेतून संघर्षाच्या तयारीची चाहूल लागते. कधी ते एखाद्याच्या विरोधाची भूमिका घेतात, तर कधी ज्याच्या विरोधाची भूमिका घेतली त्याच्यावरच स्तुतिसुमने उधळून लोकांना संभ्रमातही टाकतात. कधी एखादी भूमिका ठामपणे मांडल्यानंतरही, नंतर त्याचा ठाम इन्कार करून मी असे बोललोच नव्हतो, असे सांगत त्याचे खापर माध्यमांच्या माथीही मारण्याची कला काही नेत्यांना अवगत असते. त्यामुळे नेत्यांच्या भूमिका हा वेळोवेळी अभ्यासावा असा विषय आहे. पण तो सोपा नाही. तसा अभ्यास करावयाचा असेल, तर आपल्या भूमिका बाजूला ठेवून त्यांच्या भूमिकांकडे लक्ष द्यावे लागते. आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. पुन्हा युती, आघाडीच्या राजकारणाचे वेगळे संकेत मिळत आहेत. नेत्यांच्या स्थायी भूमिका आणि प्रासंगिक भूमिका पडताळण्यासाठी हा सर्वांत चांगला हंगाम असल्याने, भूमिकांचा अभ्यास करणाèयांकरिता ही एक चांगली संधीदेखील आहे.