हे ‘धर्मयुद्ध’ नाहीच!

08 Dec 2025 09:28:56
 
वेध....
al falah university जवळपास महिनाभरापूर्वी अल फलाह विद्यापीठाचे गुऱ्हाळ समोर आले. आपल्या देशात सर्वांच्या नाकाखाली राहून काही तथाकथित सुशिक्षित वर्गातील घटक देशविघातक कारवायांमध्ये लिप्त असल्याचे रहस्योद्घाटन झाले. संपूर्ण देशासाठी हा फार मोठा हादरा होता. आतापर्यंत अशिक्षितपणामुळे जिहादसारख्या संकल्पना रुजल्या, असे म्हटले जात असताना अगदी डॉक्टर मंडळींसारखी उच्चविद्याविभूषित, बॉम्बस्फोटासारख्या कटकारस्थानात कित्येक वर्षांपासून गुंतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. हे कथित सुशिक्षित लोक समाजात एक मानाचे स्थान बाळगून असताना प्रत्यक्षात कोणत्या जिहादी मानसिकतेत जगत होते, हा विचार आता समाजतज्ज्ञांना कोड्यात टाकणारा ठरतोय्. धर्मासाठीचा कट्टरपणा देशाभिमानापेक्षा कसा काय मोठा होतो, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
 

दहशदवादी  
 
 
या सर्व समस्या देशाला संकटात टाकणाऱ्या असतात. यात कुठेतरी पाकिस्तानचा हात आहे, वगैरे तपासांती सिद्ध झाले की खरा प्रकार लक्षात येतो. पण, याने देश अस्थिर होतो, ही वास्तविकता आहे. अशावेळी देशातील नेतेमंडळींचे काम समाजाला भरकटण्यापासून वाचविणे, कायदा-सुव्यवस्था जतन करणे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे हे असते. मात्र, काही नेते याही स्थितीत आपले भलतेच ‘राजकीय’ अजेंडे राबवीत आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर यांनी 6 डिसेंबरला बंगालमध्ये बाबरी मशिदीचा शिलान्यास करण्याचा घाट घातला. त्यासाठी देशभरातील मुस्लिमांना आवाहन केले. अनेक मुस्लिम विटा घेऊन मुर्शिदाबादला पोहोचले देखील. हा सर्व प्रकार समृद्धीच्या दिशेने अग्रेसर, शांत, समंजस, प्रगतिशील आणि तितक्याच सक्षम भारतात घडत होता. शांत, नितळ पाण्याला गढूळ करण्याचा हा प्रकार तृणमूलच्या या नेत्याने घडवून आणला. त्यावर तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ताबडतोब हुमायूं यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले. या धर्मांधतेला तृणमूलमध्ये थारा नाही, असा संदेश यातून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता हुमायूं स्वत:चा पक्ष काढून ममतांना आव्हान करतो आहे. वरवर पाहता हे दोन नेते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे दृश्य आहे. पण, प्रत्यक्षात असेच घडत आहे का, हा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या आधी काहीतरी ‘हलचल’ होणे गरजेचे होते. त्यातून तर हा प्रकार घडवून आणलेला नाही, या दिशेने विचार व्हायलाच हवा. कारण ममतांचे वैशिष्ट्य आहे की, निवडणूक जवळ आली की त्या सहानुभूती लाटण्यासाठी वाट्टेल ते करतात. कधी त्यांचा अपघात होतो, मग त्या व्हीलचेअरवर मत मागत फिरतात. कधी त्यांच्या डोक्याला दुखापत होते. मग त्या पट्टी लावून भाषणबाजी करतात. आता हे फंडे वापरणे नित्याचे झाले आणि लोकांनाही ते कळत असल्याने त्यांनी नवा डाव टाकला असावा.
हुमायूं यांच्या बाबरी उभारण्याच्या प्रकाराला प्रत्युत्तर म्हणून हिंदू संघटनांनी भव्य गीता पठनाचे आयोजन केले. त्यातही अगदी राज्यपालांपासून बड्या हस्तींनी सहभाग नोंदवला. हुमायूंच्या बाबरीला गीता पठनाने उत्तर देण्याचा प्रकार हिंदूंच्या सामाजिक आणि धार्मिक अस्मितेचा विषय बनला. बंगालमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडी त्याचे सामाजिक पडसाद स्पष्टपणे राजकीय धर्मवादाचे चित्र दाखवत आहे.al falah university तुमच्याच पक्षातील एक आमदार बाबरी उभारण्याची घोषणा करतो आणि तुम्ही पक्षप्रमुख, राज्याच्या प्रमुख म्हणून त्याला नियंत्रित करू शकत नाही, हे अजिबात शक्य नाही. उलट, राज्याच्या प्रमुखाचा वरदहस्त असल्याशिवाय इतका मोठा प्रकार घडवून आणणे निव्वळ अशक्य आहे. देशात हिंदू धर्मीयांमध्ये एकोप्याची भावना, संघटित राहण्याची जिद्द वाढीस लागली असल्याने आता धार्मिक कट्टरतेचे पत्ते पिसावे लागणार हे ममतांना वाटले असणार आणि त्यातूनच त्यांनी हा नवा डाव टाकला असणार. पण, त्यांनी काहीही केले तरी हे धर्मयुद्ध नाही आणि या सर्व प्रकाराला तसे रंगवण्याचा प्रयत्नही कोणी करू नये. कारण धर्मयुद्ध उदात्त हेतूसाठी केले जाते. केवळ कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नाही. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा केवळ महाभारतासारखा विनाश घडवतात किंवा पानिपत करतात. त्यामुळे ममतांचा हा डाव आणि हुमायूंसारखा मोहरा वापरणे बंगालमधील जनतेने डोळसपणे बघावा, एवढीच अपेक्षा आपण करू शकतो.
 
सोनाली पवन ठेंगडी
7755938822
Powered By Sangraha 9.0