नवी दिल्ली,
Available for lower berth रेल्वे प्रवाशांसाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय भारतीय रेल्वेने जाहीर केला आहे. लोअर बर्थ तिकिटांसाठी येणारी सततची धावपळ आणि अडचण आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की लोअर बर्थ वाटपाच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून हे बदल तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत तातडीने लागू होत आहेत.
या नव्या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील महिला तसेच गर्भवती महिलांना तिकीट आरक्षण करतानाच आपोआप लोअर बर्थ मिळण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लोअर बर्थ उपलब्ध असल्यास प्रवाशांना कोणताही पर्याय खास निवडण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रत्येक कोचमध्ये यासाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार लोअर बर्थांचे वाटप केले जाईल. स्लीपर कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ तर 3AC मध्ये चार ते पाच आणि 2AC मध्ये तीन ते चार लोअर बर्थ यासाठी राखीव ठेवले जातील.
दिव्यांग प्रवाशांसाठीही रेल्वेने अधिक सुलभ व्यवस्था लागू केली आहे. सर्व मेल, एक्सप्रेस, राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रिमियम ट्रेनमध्ये विशेष आरक्षण कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्लीपर क्लासमध्ये चार बर्थ (त्यापैकी दोन लोअर), तर 2AC, 3E मध्येही चार बर्थ (दोन लोअर) राखीव ठेवण्यात आले आहेत. 2S आणि CC वर्गात चार सीटांचा स्वतंत्र कोटा देण्यात आला आहे. रेल्वेने हेही स्पष्ट केले आहे की प्रवासादरम्यान कोणताही लोअर बर्थ रिकामा असल्यास तो ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला किंवा दिव्यांग प्रवाशांना तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे या प्रवाशांना प्रवास अधिक आरामदायी होईल आणि लोअर बर्थसाठी होणारी धांदल मोठ्या प्रमाणात कमी होईल. भारतीय रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून प्रत्यक्ष प्रवासापर्यंत अधिक सोयीस्कर आणि सुलभ अनुभव मिळण्याची शक्यता आहे.