कारंजा
Karanja water supply project शहरातील नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेचे काम कार्यारंभ आदेशाच्या तारखेपासून १८ महिन्याच्या निर्धारित कालखंडात कंत्राटदाराला पूर्ण करावयाचे बंधनकारक आहे. योजनेच्या कामाला २४ महिने लोटले तरी अजूनपर्यंत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे नगरपंचायतने पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले .
खैरी धरणामध्ये बाराही महिने आरक्षित पाणी उपलब्ध असून नागरिकांना कित्येक वर्षांपासून कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. शहरात पाणी समस्येने गंभीर स्वरूप घेतले आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारा नागरिकांना पाच ते सहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. या समस्येतून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा म्हणून कारंजा शहराकरिता अमृत २.० ही पाणीपुरवठा योजना ८ मे २०२३ रोजी मंजूर झाली. या योजनेची कार्यान्वय यंत्रणा कारंजा नगरपंचायत आहे. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजूर योजनेच्या कामाचा नगरपंचायतकडून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश मंजूर झाला. कार्यारंभ आदेशापासून पुढील १८ महिन्यात योजनेचे काम पूर्ण करणे कंत्राटदारास बंधनकारक करण्यात आले. मात्र, २४ महिन्याचा कालावधी होऊनही नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. आणि नागरिकांना नवीन योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
शहरातील पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कंत्राटदाराकडून लवकरात लवकर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून घ्यावे व कृत्रिमपणे भेडसावणार्या पाणी समस्येतून दिलासा द्यावा अशी मागणी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीने निवेदनातून नगरपंचायतकडे केली आहे.निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.