नागपूर,
Maharashtra Winter Session विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली असून, त्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी पारंपरिक बहिष्कार कायम ठेवत अनुपस्थिती दर्शवली. महाविकास आघाडीतील पक्षांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीचा मुद्दा अधिवेशनाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव पुढे करण्यात आले असून, त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यावर आघाडीचा आग्रह आहे.
आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. सामंत म्हणाले, “या अधिवेशनात महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील. विरोधकांकडून मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिले जाईल. त्यांच्या रचनात्मक सूचनांचा निश्चित विचार केला जाईल.”
मात्र विरोधी Maharashtra Winter Session पक्षनेतेपदाच्या प्रश्नावर त्यांनी सूचक टिप्पणी करत म्हटले, “विरोधकांनी एकदा आपले संख्याबळ तपासावे. भास्कर जाधव हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना विधानसभा तसेच विधान परिषदेचे दांडगे अनुभव आहे. शिवसेना ठाकरे गटाने त्यांचे नाव देऊन पत्र दिले आहे, पण खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेते करण्याची वेळ आली तर नेमकं काय होतं, हे पुढे स्पष्ट होईल.”शिवसेना आणि भाजप यांच्यातील कार्यकर्त्यांच्या हालचालींवरून निर्माण झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते किंवा नेते फोडू नयेत, असा निर्णय घेतलेला आहे.” या वक्तव्यामुळे अलीकडच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अस्वस्थतेला विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.