नागपूर,
dairy business development ग्रामीण भागात गाई–म्हशींसाठी कृत्रिम रेतन सेवा देणाऱ्या तंत्रज्ञांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “मैत्री – मल्टीपर्पज आर्टिफिशियल इनसेमिनेशन टेक्नीशियन” उपक्रमातील तिसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सोमवारी (८ डिसेंबर) नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माफसूचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे यांनी कृत्रिम रेतनामुळे गोवंश सुधारणा, उच्च प्रतीच्या कालवडी निर्मिती आणि शेतकऱ्यांचा सामाजिक-आर्थिक विकास वेगाने घडेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जे. पी. कोरडे यांनी “मैत्री” प्रशिक्षणामुळे दुग्ध व्यवसायातील अडचणी दूर होऊन बेरोजगार युवकांना उद्योजकतेचा मार्ग खुला होईल, असे मत व्यक्त केले. प्रकल्प समन्वयक डॉ. डी. एस. रघुवंशी यांनी प्रशिक्षित तंत्रज्ञ ग्रामीण शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आवश्यक तांत्रिक सेवा पोहोचवतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. डी. एस. काळे यांनी जातिवंत जनावरांचे संवर्धन व दुग्ध उत्पादन वृद्धीचे महत्त्व स्पष्ट केले. या बॅचसाठी ३० सुशिक्षित बेरोजगार तरुणांची निवड करण्यात आली होती. प्रशिक्षण समन्वयक डॉ. क्रांती खारकर यांनी कृत्रिम रेतनाशी संबंधित सर्व तांत्रिक प्रात्यक्षिके प्रत्यक्ष शिकविण्यात आली असल्याचे सांगितले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी डॉ. रघुवंशी, डॉ. खारकर, डॉ. काळे, श्री. डी. व्ही. पाटील तसेच विभागातील पीजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.