मुंबई,
Maratha community convention in Delhi मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आता दिल्लीमध्ये भव्य राज्यव्यापी अधिवेशन घेण्याची घोषणा केली असून राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने राजधानीत दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबईनंतर दिल्लीमध्ये धडक देत हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्यामुळे महायुती सरकारची चिंता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळे निर्माण केले जात असल्याचा त्यांचा आरोप होता. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नोंदी सापडूनही त्या पुढे पाठविल्या जात नसल्याने अनेकांना प्रमाणपत्रे मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. काही अधिकारी जाणीवपूर्वक प्रक्रिया रोखत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सातारा, पुणे आणि औंध संस्थानांशी संबंधित गॅझेटचे आदेश तातडीने काढण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.

यावेळी जरांगे यांनी महायुतीतील दोन मंत्र्यांवर थेट हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांच्यावर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच अजित पवारांनी पक्षाची वाढ करावी; पण असे "लोक" बाजूला ठेवले नाहीत तर त्याचा फटका २०२९ च्या निवडणुकांमध्ये बसू शकतो, असा टोला त्यांनी लगावला. छगन भुजबळ यांनी सारथी संस्थेच्या अनेक योजना बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यामुळे मराठा तरुणांच्या प्रगतीचे मार्ग अरुंद होत असल्याचे सांगितले. दरम्यान दिल्लीतील आगामी अधिवेशनामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे चित्र असून, त्यामुळे राज्य सरकारवरचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्य-केंद्र सरकारपुढे गंभीर स्वरूपात येणार आहे.