
मिळालेल्या माहितीनुसार, खैरागड जिल्ह्यातील कुम्ही गावाजवळील बकरकट्टा पोलिस ठाण्यात या सर्व नक्षलवाद्यांनी आज सकाळी स्वतःहून उपस्थित राहून शस्त्रे खाली ठेवली. हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सीसीएम, डीव्हीसीएम, एसीएम आणि पीएम या स्तरांवरील सदस्यांचा समावेश असून, त्यांच्या विरोधात एमएमसी झोनमधील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. रामधेर मज्जीसह आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी विविध आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते—यात एके-४७, इन्सास, एसएलआर आणि ३०३ रायफल्सचाही समावेश आहे. काही सदस्यांकडे शस्त्रे नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले.
काही दिवसांपूर्वीच एमएमसी झोनचे प्रवक्ते अनंत यांनीही आपल्या साथीदारांसह मध्य प्रदेश–महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील क्षेत्रात शरणागती पत्करली होती. त्यामुळे एमएमसी झोनमधील नक्षलवाद आता पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या दिशेने गेला आहे, असे स्पष्टपणे दिसत आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद निर्मूलनाची अंतिम मुदत सरकारने मार्च २०२६ निश्चित केली आहे आणि आजचे हे आत्मसमर्पण त्या दिशेने झालेली निर्णायक पावले मानली जात आहेत.