ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप

09 Dec 2025 21:57:20
नवी पेठ,
Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
 
 
BABA AADHAV
 
 
 
 
अंत्यसंस्कारावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार चेतन तुपे तसेच पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
 
श्रद्धांजलीपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकरी, श्रमिक, गरीब आणि वंचित वर्गासाठी संपूर्ण आयुष्य झिजवले. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर ते आयुष्यभर लढत राहिले. अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका घेऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षरत राहिले.
 
पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालत डॉ. आढाव यांनी समाज परिवर्तनाची लढाई उभी केली. “महाराष्ट्राने एक संघर्ष योद्धा गमावला,” असे पवार भावूक होत म्हणाले.
 
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी डॉ. आढाव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले. त्यांच्या पत्नी शीलाताई आढाव, मुलगे असीम आढाव आणि अंबर आढाव उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0