विज्ञानाची कास धरून जीवन सुकर करा: मन्साराम दहिवले

09 Dec 2025 18:26:34
​लाखांदूर,
mansaram-dahiwale : जीवनात विज्ञानाची कास धरणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे, हीच काळाची गरज आहे. विज्ञानाच्या सहाय्यानेच आपण आपले दैनंदिन जीवन अधिक सुकर आणि समृद्ध करू शकतो, असे प्रतिपादन शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी पंचशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मन्साराम दहिवले यांनी केले. ​९ डिसेंबर रोजी पारडी येथील आदर्श हायस्कूल शाळेच्या प्रांगणात शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीसाठी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली होती.
 
 
 
BHANDRA
 
 
 
​दहिवले पुढे म्हणाले, "विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील सिद्धांत नव्हेत, तर तो जीवनाचा एक दृष्टिकोन आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यावर लक्ष केंद्रित न करता, आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागील वैज्ञानिक कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून जे नवे शोध आणि कल्पना मांडल्या जात आहेत, ते आपल्या भावी पिढीच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक आहेत."
 
 
​ या प्रदर्शनीमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध वैज्ञानिक उपकरणे व प्रकल्पांचे सादरीकरण केले. विकसित आणि आत्मनिर्भर भारत या मुख्य संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात, सौर ऊर्जा, जलसंधारण, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, तसेच शेती आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना असलेले प्रकल्प लक्ष वेधून घेत होते. विशेषतः ग्रामीण भागातील समस्यांवर विज्ञानाच्या मदतीने केलेले उपाय उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
 
 
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मन्साराम दहिवले, उद्घाटक म्हणून पारडीचे सरपंच शिवशंकर चव्हारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा डॉ सुधीर मस्के, दयाल भोवते उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक सुनील भोवते, विश्वपाल हजारे, किरण भोवते, पारडीचे उपसरपंच गीता शहारे, मोहरणाचे केंद्रप्रमुख डॉ रविंद्र शिवरकर, तावशीचे केंद्रप्रमुख सोपान शेकडे, भागडीचे केंद्रप्रमुख यशपाल बगमारे, केंद्रप्रमुख चंद्रशेखर रामटेके, राधेय विद्यालयाचे मुख्याध्यापक झोडे, विरली बु येथील गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदनवार, लाखांदूर येथील मंजुळामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक मेश्राम, मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दोनाडकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
 
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे प्रास्ताविक लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांनी केले. संचलन उच्च श्रेणी मुख्याध्यापक योगेश कुटे तर आभार जैतपूर केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास वैद्य यांनी मानले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमुळे पारडी परिसरात एक वैज्ञानिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Powered By Sangraha 9.0