खात्यातील साहेबांच्या वाहनाला ‘नो’ चालान; बाकी परेशान

09 Dec 2025 20:13:51
वर्धा, 
wardha-news : शहरात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही रस्त्यावर तुमचे चारचाकी, दुचाकी वाहन चालान होऊ शकते. तुमचे नशिब खराब असेल तर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा नका पाळू तुमच्या मोबाईलवर चालानचा मॅसेज आल्याशिवाय राहत नाही. शहरात काल रात्री श्रीराम मेडिकलपुढे पोलिस विभागाची गाडी अर्ध्या रस्त्यावर उभी होती. परंतु, साहेबांच्या वाहनाला कोण चालान करणार?
 

CHALAN 
 
 
 
वर्धा शहरात सध्या चालान मारण्याची चढाओढ लागलेली आहे. त्याला वाहतूक निरीक्षक पोलिसही काही करू शकत नाहीत. त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनीच चालान मारण्याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे वाहतुकीची व्यवस्था सांभाळण्याऐवजी महिला आणि पुरुष वाहतूक निरीक्षक पोलिस दिवसभर सावज शोधत असतात. बर्‍याचदा आपण काय चुक केली याची माहितीही वाहन चालकांना नसते. त्यांच्या मोबाईलवर चालानची पावती मात्र पोहोचलेली असते. निर्मल बेकरी चौक ते इंगोले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर्वी नाका आणि बजाज चौकात वाहतूक सुरक्षा कमी आणि चालानच जास्त अशी परिस्थिती असते. कधी कधी तर सेवाग्राम मार्गावर पाटबंधारे विभागाचे कार्यालय, व्हीआयपी मार्गावर माजी आमदार रणजित कांबळे यांच्या निवासस्थान असलेल्या रस्त्यावर तर एवढ्यात केसरीमल कन्या शाळा ते शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर सावलीत उभे राहून दुचाकी स्वारांना अडवून कायद्यावर बोट ठेवत वाहतूक पोलिसांच्या हातात असलेल्या मशीनमध्ये फोटो काढल्या जातो म्हणजे तुमची चालान नकीच फाटलेली असते.
 
 
शहरातील वाहतूक नियंत्रणाकरिता लावलेले सिग्नल वेळी अवेळी लागतात. इकडून जाताना सरळ आणि दहाच मिनिटांत परत येत असताना सिग्नल लागल्याचे अनेकदा घडले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याने दुचाकीस्वाराची आयतीच व्हीकेट घेतल्या जाते. आम्हाला टार्गेट असल्याने आमचाही नाईलाज असल्याचे अनेक वाहतूक निरीक्षक खाजगीत बोलताना सांगतात. नियमांची अमल बजावणी नाही पण चालान फाडल्या जात असल्याने वाहन चालक आम्हाला बोलत असल्याचेही वाहतूक पोलिस निरीक्षक बोलतात. एवढेच नव्हे तर दुकानांपुढे उभ्या असलेल्या दुचाकी किंवा चार चाकी वाहनांवरही कारवाई केली जात आहे. दरम्यान, काल सोमवारी रात्री ६ वाजून ५६ मिनिटांनी श्रीराम मेडिकल पुढे एम. एच. ३२ एएस ८५८३ क्रमांकाची पोलिस विभागाचा दिवा असलेले चाकी वाहन उभे होते. विशेष म्हणजे या वाहनातील चालक आणि अधिकारी रस्त्यावर वाहन उभे ठेऊन औषध घेण्याकरिता गेले होते. दुसरीकडे चार चाकी वाहनात चालक बसुन असतानाही त्या वाहनाला चालान दिले जाते. आर्वी नायावर तर सिग्नलच अवैध असतानाही सिग्नल तोडल्याचे दंड आकारले आहेत. त्यामुळे साहेबांच्या वाहनाला ‘नो’ चालान आणि बाकी वाहन चालक परेशान अशी परिस्थिती वर्धेत दिसुन येत आहे.
Powered By Sangraha 9.0