वर्धा जिप एम्प्लाईज को-ऑप बँकेसह दोन दुकाने फोडली

09 Dec 2025 20:10:38
समुद्रपूर, 
shops-vandalized : शहरातील डायमंड कॉम्प्लेसमधील वर्धा जिल्हा परिषद एम्प्लाईज को-ऑप बँकेसह दोन दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांना बँकेची तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने तिजोरीतील ५ लाख रुपये वाचले. मात्र, एका दुकानातून १५ हजारांची रोख पळविली. तर दुसर्‍या दुकानातून चोरट्यांना रिकाम्या हाती बाहेर पडावे लागले. ही घटना आज मंगळवार ९ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आहे.
 
 
K
 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डायमंड कॉम्प्लेसमध्ये तीन बँका तसेच अनेक दुकाने आहेत. त्यापैकी डायमंड कॉम्प्लेसच्या दर्शनीय भागात असणार्‍या वर्धा जिल्हा परिषद एम्प्लाईज को-ऑप बँकेसह इतर दोन दुकानांचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला. बँकेतील तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने तिजोरीतील ५ लाख ६२ हजार रुपये वाचले तर बाजूच्या वामन फटींग यांच्या पवन हार्डवेअर या दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले १५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. त्यालाच लागून असलेल्या डायमंड कॉम्प्लेसच्या गोडाऊनचे सुद्धा चोरट्यांनी शटर तोडले. मात्र, येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
 
 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार रवींद्र रेवतकर तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वर्धेवरून फिंगर प्रिंट पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने जाम रोडकडे धाव घेतली होती. परंतु, पुढे गेला नाही. बँकेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचे त्यामध्ये चित्रिकरण होऊ शकले नाही. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0