...अखेर अहेरी-आलापल्ली मुख्य रस्त्याचे काम सुरू

09 Dec 2025 18:24:56
आलापल्ली, 
Aheri-Alapalli main road : नागरिकांसाठी मागील अनेक वर्षांपासून मोठी डोकेदुखी ठरलेल्या अहेरी-आलापल्ली मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती कामाला अखेर भाजपच्या ‘चक्का जाम’ आंदोलनानंतर त्वरित सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचे यश पाहून समाधान व्यक्त केले असून, त्यांना आता लवकरच या त्रासातून मुक्ती मिळण्याची आशा आहे.
 
 
ROAD
 
अहेरी शहराला आलापल्लीशी जोडणारा हा मुख्य रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, त्याची अवस्था दयनीय झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. तसेच वाहनचालकांना आणि नागरिकांना धुळीमुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत होता.
 
 
दोन वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही आणि ते रखडतच राहिले. नागरिकांकडून सतत मागणी होत असतानाही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत होता. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापार्‍यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने (भाजप) या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेतली. रस्त्याच्या तत्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी भाजपने ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले.
 
 
भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत वाहतूक पूर्णपणे थांबवली. या आंदोलनामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला. कारण मुख्य रस्त्यावरच झालेल्या या आंदोलनाने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत रव्वा यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली. आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना, त्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून ते लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे लेखी आश्‍वासन दिले. या लेखी आश्‍वासनानंतरच भाजपचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
 
 
कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार, दुसर्‍याच दिवशी अहेरी-आलापल्ली मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. आता कामाला सुरुवात झाल्याने आम्हाला लवकरच या त्रासातून मुक्ती मिळेल, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0