वेध
- हेमंत सालोडकर
Prayagraj Mahakumbh : प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभाचे आयोजन भव्य दिव्य आहे. तेथे अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने येऊन गंगेत पवित्र स्नान करत आहेत. नव्हे, तर जगभरातील हिंदू बांधव आणि विविध धर्मांतील लोक या अमृतकुंभाचा लाभ घेत असतानाच, वर्धा जिल्ह्यातील तरोडा या लहान गावातही छोट्या प्रमाणात असलेला, पण भक्ती आणि श्रद्धेत कुठेही कमी नसलेला संतमेळा मागील आठवडाभर सुरू होता. त्याची सांगता शनिवारी पहाटे प्रक्षाळपूजेनंतर झाली. अनेक थोर पुरुषांच्या स्पर्शाने पवित्र असलेल्या वर्धा जिल्ह्यात महाराजांचे आगमन झाले आणि तेथील लोकांनी त्यांना आपलेसे करून घेतले. लोकांच्या आदरातिथ्याला ते नाकारू शकले नाहीत. अशा लोकानुनय केजाजी महाराजांची पुण्यतिथी तरोडा येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. मागील काही दिवस तरोडा गाव संतांच्या मांदियाळीने फुलून गेले होते. आठवडाभर संतांचे कीर्तन, नामजप, टाळ, मृदंग, हरिनाम यांचा अखंड अमृतप्रवाह सुरू होता. येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी कुणालाही आमंत्रणाची गरज पडत नाही. कुणाचे औपचारिक आगतस्वागत होत नाही. तरीही इतर गावांतील लोक महाराजांच्या आशीर्वादासाठी येथे येतात आणि भक्ती-सागरात स्नान करतात. आठवडाभर तर गावात अक्षरश: चहलपहल होती. गावात दसरा, दिवाळीसारखे वातावरण होते. केजाजी महाराजांच्या मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई केलेली मंदिर परिसरात मंडप टाकून तेथे कीर्तनकारांची प्रवचने झाली. यात समाजातील सर्व प्रकारचे लोक सहभागी झाले होते. गावाच्या प्रत्येक घरातील व्यक्तीचा उत्सवात सहभाग होता. गरीब, श्रीमंत, जातपात याला कुठेही थारा नव्हता. प्रत्येक जण केजाजी महाराजांच्या ओढीने एकत्र आले होते. माझाही काही या उत्सवात सहभाग असावा म्हणून प्रत्येक जण सेवा अर्पण होता.
गावातून लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या आणि जुन्या मैत्रिणींच्या भेटीने आनंदून गेल्या. विशेष म्हणजे मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनात या उत्सवात तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा होता. कुठेही तरुणाईचा उन्माद नाही, होता फक्त उत्साह. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वच जण कामात व्यस्त होते. उत्सवाच्या यशस्वितेसाठी झटत होते. कुणालाही त्रास नाही याची काळजी घेत होते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोपालकाल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी झाली. यात दहीहंडी फोडल्यानंतर प्रत्येक जण एकमेकांवर दही उडवत होते, त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करत होते. आठवडाभराच्या उत्सवात रोज कीर्तनातून समाजप्रबोधन होत होते. यात श्रोत्यांमध्ये मोठ्यासंह तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता. कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या संतांची थोरवी ते ऐकून होते. या कीर्तनकारांना, साधुसंतांना शेवटच्या दिवशी बिदागी देण्यात आली आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यात कुठेही खंड पडला नाही. उलट यात तरुणांचा सहभाग वाढत आहे. महाप्रसादाला तर तरुणांचा सहभाग पाहण्यासारखा असतो. सर्व जण जमिनीवर बसून भोजन घेत होते. एक पंगत उठली की पंगत बसण्याअगोदर उष्ट्या पत्रावळी उचलून झाडून पुन्हा भोजनासाठी जागा तयार करण्यात येत होती. यात कुठेही कुणाचेही उणेदुणे काढत नव्हता. अशा सहभागातून सामाजिक सलोख्याची भावना प्रबळ होत होती.
Prayagraj Mahakumbh : या उत्सवाच्या निमित्ताने शेजारच्या गावातील, नागपूरसह अनेक शहरातील लोक येथे भेट देतात आणि यात्रा म्हटली की दुकाने आलीच. त्यानुसार वेगवेगळ्या साहित्याची, खाद्यपदार्थांची येथे मोठ्या प्रमाणात थाटली होती. अनेकांना रोजगार मिळाला. हातात पैसा खेळत असल्याने आनंद दुणावला होता. आधुनिकीकरणाच्या काळात यात्रेत काही बदल झाले, पण ते स्वीकारणेही आवश्यक आहेत. पारंपरिक पदार्थांसह चिनी खाद्यपदार्थांचीही दुकाने मोठ्या प्रमाणात होती. पण गावातील आर्थिक बळकटीसाठी ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. यात्रेच्या निमित्ताने बैल बाजारही लागला होता. यात प्रकारच्या बैलांची खरेदी-विक्री झाली. बैल खरेदीची प्रक्रिया अनुभवणे मोठे रंजक असते. तो अनुभवही अनेकांनी घेतला. यात्रेच्या निमित्ताने विविध प्रकारचे लोक एकत्र येत असल्याने सामाजिक एकरूपता साधली जाते. सर्वच जण सर्वांमध्ये एकरूप होतात आणि एकात्मतेची भावना वाढीस लागते. हा संदेश केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना आला. गावाच्या प्रवाही, निर्मळ, वातावरणात, मानवतेच्या विचारांचा अमृतकुंभ कायम राहावा, हीच अपेक्षा.
- ९८५०७५३२८१