प्रयागराज,
Mahakumbh 2025 : देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून महाकुंभात दररोज लाखो तीर्थयात्रेकरूंची सेवा केली जात आहे. तीर्थयात्रेकरूंसाठी पौष्टिक अन्न, आरोग्यसेवा, सुरक्षित वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी यासारख्या महत्त्वपूर्ण सेवा पुरवल्या जात आहेत. ‘तीर्थयात्री सेवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून रिलायन्स यात्रेला सुरक्षित, आरामदायक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
कंपनीनुसार, तीर्थयात्रेकरूंसाठी 8 प्रकारे सेवा दिली जात आहे. यातील सर्वात मोठी सेवा म्हणजे अन्न सेवा, जिथे दररोज हजारो भाविकांना मोफत भोजन दिले जात आहे. रिलायन्सचे स्वयंसेवक विविध अखाड्यांमध्ये मोफत अन्न आणि पाण्याची व्यवस्था करत आहेत. रिलायन्स फाउंडेशन पुरुष व महिलांसाठी वॉर्ड, ओपीडी आणि दंतचिकित्सा सेवा यांसारख्या 24x7 वैद्यकीय सेवा पुरवते. महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिनदेखील वितरित केले जात आहेत. तसेच यात्रेकरूंच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी म्हणाले, “असे म्हटले जाते की जेव्हा आपण तीर्थयात्रेकरूंची सेवा करतो, तेव्हा आपल्यालाही आशीर्वाद मिळतो. सहस्रकात एकदा होणाऱ्या या महाकुंभात, आमच्या सेवांचा उद्देश यात्रेकरूंच्या गरजा पूर्ण करणे आहे. आम्ही ‘वी केअर’ या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतो. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक मेळाव्यात, लाखो तीर्थयात्रेकरूंच्या आरोग्य, कल्याण आणि सुरक्षिततेसाठी कार्य करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.”
रिलायन्स जिओ प्रयागराजमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी पुरवत आहे. येथे नवीन 4G आणि 5G बीटीएस टॉवर्स उभारण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी टॉवर्स आणि स्मॉल सेल्स तैनात करून संपूर्ण नेटवर्क पायाभूत सुविधा सुधारली आहे. सर्व भाविकांना अखंडित संचार सुविधा मिळावी यासाठी मुख्य ठिकाणी नवीन ऑप्टिकल फायबर पसरवण्यात आले आहेत.
रिलायन्स अधिकाधिक तीर्थयात्रेकरूंपर्यंत पोहोचण्यासाठी शारदा पीठ मठ ट्रस्ट द्वारका, श्री शंकराचार्य उत्सव सेवालय फाउंडेशन, निरंजनी अखाडा, प्रभु प्रेमी संघ चॅरिटेबल ट्रस्ट आणि परमार्थ निकेतन आश्रम यांसारख्या प्रसिद्ध आध्यात्मिक संस्थांशी सहकार्य करत आहे.