दहावी- बारावीत क्रीडाचे ग्रेस गुण

13 Feb 2025 17:11:51
नागपूर,
Aaple Sarkar Portal : इयत्ता 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना स्पर्धेतील सहभाग व प्राविण्यानुसार दिले जाणारे ग्रेस गुण अर्ज यावर्षीपासून (2024-25) शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे केवळ ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत.
 
 
 
portal
 
 
 
यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांमार्फत पार पडत होती. तथापि, काही मानवी त्रुटींमुळे अर्ज सादर करण्यास विलंब होत असे किंवा काही विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण होत असे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून 2024-25 शैक्षणिक वर्षापासून पूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
 
 
खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले सरकार ॲप अथवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज ऑनलाईन भरावा. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळ स्पर्धामधील सहभाग किंवा प्राविण्य यासाठी सवलत गुण अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावा. अर्जाची प्रत आपले सरकार पोर्टलद्वारे सर्वप्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास पोहोचेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी किवा शाळांनी प्रत्यक्षपणे अर्ज सादर करू नये.
 
 
आपले सरकार पोर्टल, ॲपवर लॉगिन करून अर्ज भरणे आवश्यक खेळ व प्रमाणपत्रांची माहिती अपलोड करणे, विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करणे, अर्जाची स्थिती पोर्टलवर नियमित तपासणे याबाबतची नोंद शाळा व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी घ्यावी. ही नवीन प्रणाली पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करेल व खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलत गुण प्रक्रियेत सुसूत्रता राहील. तरी, सर्व संबंधितांनी या नवीन ऑनलाईन प्रक्रियेनुसारच अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0