वाशीम,
Sant Sevalal Maharaj Jayanti : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बंजारा समाजाचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात आणि प्रमुख उपस्थितीत शनिवारी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजतापासून संत सेवालाल मंदिर परिसरात हा जयंती महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमास बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंग महाराज, कबीरदास महाराज,जितेंद्र महाराज,यशवंत महाराज, सुनील महाराज,रायसिंग महाराज, शेखर महाराज, गोपाल महाराज यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, माजी आमदार नीलय नाईक, जेष्ठ मार्गदर्शक हरिचंद राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात छत्रपती संभाजी नगर येथील सुप्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड व संच यांचे बंजारा भजन आणि भक्तीगीत गायन होणार आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या बंजारा समाजातील मान्यवरांचा ‘सेवा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पोहरादेवी, उमरी, वसंतनगर, वाई गौळ येथील विकासकामांमध्ये विशेष सहकार्य करणार्या शासकीय अधिकार्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
ना. संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाने पोहरादेवी विकास आराखडा मंजूर करून येथे कोट्यवधी रूपयांची विकासकामे सुरू केली. पोहरादेवीस आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणणार्या ‘बंजारा विरासत’ नंगारा भवन या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, हे विशेष. पोहरादेवी येथे होत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवात यवतमाळ,वाशीम व लगतच्या जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीने केले आहे.