अंबाझरी पूल 1 एप्रिलपासून वाहतुकीसाठी मोकळा

    दिनांक :19-Feb-2025
Total Views |
- विद्युत वाहिनीसाठी निधी मंजूर
 
नागपूर, 
Ambazari bridge अंबाझरी तलाव परिसरात बांधण्यात आलेला नवीन पूल या मार्गातील 132 केव्हीच्या सहा भूमिगत विद्यूत वाहिन्यांमुळे वाहतुकीसाठी रखडला होता. या वाहिन्या स्थानांतरित करण्यासाठी राज्य शासनाकडे महापारेषणने ऑगस्ट 2024 मध्ये 3 कोटी 70 लाख 2 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाने निधी न दिल्यामुळे काम रखडले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला फटकारताच निधी मंजूर करण्यात आला.
 
 
AMBAJHARI PUL
 
Ambazari bridge फेब्रुवारी अखेरपर्यंत विद्युत वाहिन्या स्थानांतरित केल्या जातील आणि 1 एप्रिलपर्यंत पुलावर दोन्हीकडील वाहतूक सुरू होईल, अशी हमी विभागीय आयुक्तांनी न्यायालयात दिली. अंबाझरी परिसरातील पूरग्रस्तांनी उच्च न्यायालयात याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. या जनहित याचिकेत महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीने मध्यस्थी अर्ज दाखल केला. पुलाजवळून गेलेली 132 केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी स्थानांंतरित करण्यासाठी प्रशासन निधी उपलब्ध करून देत नसल्याची तक्रार कंपनीने केली होती. न्यायालयाने राज्य शासनाला याप्रकरणी खडसावल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी निधी मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. अंबाझरी तलावाशी संबंधित कार्यासाठी तयार उच्चस्तरीय समितीची बैठक 14 फेब्रुवारी रोजी पार पडली. विद्युत वाहिनी स्थानांतरित करण्याचा मुद्दा समितीच्या बैठकीत मांडला गेला नसल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. अडथळ्याबाबत संबंधित विभागाने समितीनेकडे माहिती द्यावी, समितीमार्फत यावर उपाययोजना केली जाईल असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी शपथपत्राच्या माध्यमातून दिले.
 
 
 
मार्गावरील प्रवासी त्रस्त
Ambazari bridge अंबाझरी पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम बंद करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून हगणा व इतर गावांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या अडचणीची दखल घेत मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने बांधकाम विभागाला खडसावले होते. त्यानंतर तात्काळ रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु आता दुसऱ्या बाजूचे काम बंद असल्याने वाहतुकीस मोठा अडखळा निर्माण होत आहे.