मातृभाषेच्या अज्ञानाने मनःशाती हरवली

    दिनांक :19-Feb-2025
Total Views |
- डॉ. संजय उपाध्ये यांचे भाष्य
- अभिजात मराठी आणि मनःशांती विषयावर व्याख्यान

नागपूर, 
Dr. Sanjay Upadhyay : माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जके, अशी मराठीची महती सांगणाऱ्या संत वाङ्मयामुळे मराठी भाषा बहुश्रृत पद्धतीने पिढ्यानपिढ्या प्रवाही राहिली. पण बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी साहित्यिकांच्या द्वंद्वात भाषेची सरलता हरवत गेली. त्यातच इंग्रजीच्या भडिमारामुळे मातृभाषा मागे पडल्याने मनःशांतीही हरवत चालल्याचे प्रतिपादन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. शक्तिपीठ रामनगरच्या वतीने आयोजित श्री दासनवमी उत्सवात अभिजात मराठी आणि मनःशांती या विषयावर व्याख्यानाचे पहिले पुष्प आज त्यांनी गुंफले. यावेळी मराठी भाषेचे आजचे स्वरूप, आभिजात दर्जा, हरवत चाललेली मराठी अस्मिता, इंग्रजीचे गारूड यासह भाषेविषयक इतरही बाबींचा नर्मविनोदी अंगाने धांडोळा घेतला.
 
 
shaktipith
 
डॉ. उपाध्ये म्हणाले, मातृभाषा ही आईसारखी असते. त्यामुळे मातृभाषेची पकड चांगली असली की आई जवळ असल्याचा भास होतो. ज्या अमेरिकेत गेलेल्या मुलांचे मराठी चांगले आहे ते तिथे कंटाळत नाही. त्यांच्यासोबत भाषेच्या रुपाने आईचा सहवास असतो. त्यामुळे त्यांना मनःशांती मिळते असे संशोधन झाले आहे. तुमची भाषेवरची पकड ज्ञानाच्या क क्षा विस्तारते. मातृभाषेतून शब्द थेट हृदयापर्यंत पोहचतात. पण वसाहतवादातून खास करून महाराष्ट्रीय माणूस बाहेर निघायला तयार नसल्याने मराठीचेच अज्ञान असलेली व जुन्या पिढीला स्टुपिड समजणारी पिढी तयार होत असल्याचे वास्तव त्यांनी विवेचनात मांडत भाषा सांभाळता न आल्यास ती एक दिवस संग्रहालयात जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अनेक साहित्य संमेलने आजवर झाली. पण सामान्य माणसाच्या मनात मराठी साहित्याबद्दल आस्था, प्रेम, आपुलकी, प्रेम, अस्मिता साहित्यिकांना निर्माण करता न आल्याची खंत Dr. Sanjay Upadhyay डॉ उपाध्ये यांनी बोलून दाखविली.
 
 
मराठी माणूस प्रचंड कोरडा
भाषा ही समाजासोबत पुढे जाते. दक्षिण भारतीय तसेच हदी भाषक राज्यांनी स्वतःच्या भाषा समाजासोबत पुढे नेल्या. पण मराठी माणूसच मुळातच कोरडा. जवळच्याचे कौतुक त्याला कधी करताच आले नाही. भाषेचेही कौतुक त्याला करता न आल्याने आपली भाषा पुढे कशी जाईल हा प्रयत्नच होत नसल्याचे डॉ. उपाध्ये यावेळी म्हणाले.
 
 
जर्दा खाऊन दर्जा मागितला
मराठी भाषा ही अभिजात होतीच पण तिला आता शासकीय कोंदण मिळाले. त्यासाठीची मागणीही बरीच जुनी होती. पण आपण जर्दा खाऊन दर्जा मागितला. त्यामुळे समोरच्याने अभिजात न ऐकता अजिबात ऐकले. त्यामुळे दर्जा कसा लवकर मिळणार असे वास्तव भाष्य डॉ. उपाध्ये यांनी विडंबनात्मक पद्धतीने केले.