गोंदिया,
Pankaj Bhoyar : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन लोकाभिमुख कामांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाने कुशल कामे करावीत, असे निर्देश गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीदिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 18 फेब्रुवारी रोजी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
पुढे डॉ. भोयर म्हणाले, शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन यशस्वीपणे राबवा. ‘पीएम श्री शाळा’ योजनेत गोंदिया जिल्ह्यात 20 शाळा असून या शाळांचे विकासात्मक अंकेक्षण (ऑडिट) करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. गोंदिया जिल्ह्यात 1642 शाळा आहेत, ‘आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 9 छोट्या व 9 मोठ्या शाळांचे बांधकाम करण्यात आले आहे. या शाळांचे विकासात्मक अंकेक्षण (ऑडिट) करण्यात यावे, 290 विविध कार्यकारी सहकारी संस्था असून 39 आदिवासी सहकारी संस्था आहेत.
पैकी 121 सहकारी संस्थांचे संगणकीकरण झाले आहे. 33 रेती घाट आहेत. रेती चोरी संदर्भातील अवैध उत्खनन व वाहतूक करणार्यांवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वन विभागाने तत्काळ सर्व्हे करुन नुकसान भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी वनाधिकार्यांना दिले. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी शिक्षण विभागांतर्गत शाळा, शिक्षक व विद्यार्थी, जिल्हा परिषद शिक्षक स्थिती, विद्यार्थी अपार आयडी बाबत स्थिती, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, पीएम श्री योजना, दप्तरमुक्त शनिवार, अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा बांधकाम, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये एक मॉडेल स्कुल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकसीत करणे, प्रथम संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यातील शाळांचा गुणवत्ता विकास, जिल्ह्यात कार्यरत असेलेले प्रमुख खनिज व गौण खनिज खाणपट्टे, अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणे, जिल्हा खनिज प्रतिष्ठान बाबत सद्यस्थिती, जिल्ह्यातील रेती/वाळू डेपोची सद्यस्थिती आदींबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली.
यावेळी आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, जिप सभापती लक्ष्मण भगत, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, सुधीर महामुनी, जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनारकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी रविंद्र मारबते यांच्यासह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.