तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा फटका

    दिनांक :02-Feb-2025
Total Views |
- प्रा. जयसिंग यादव
‘Artificial Intelligence’ : आजचे जग हे तंत्रज्ञानाचे आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या येण्याने तर तंत्रज्ञानात अद्भुत आणि विस्मयकारक बदल झाले आहेत. ‘एआय’च्या मदतीने एका तासात होणारे काम अवघ्या पाच मिनिटांमध्ये आहे. ‘चॅट जीपीटी’, ‘मेटा एआय’ हे ‘एआय’ जगतातील अग्रणी मानले जातात; मात्र या सर्वांचीच झोप उडवणारी ‘एआय’ यंत्रणा चीनने आणली आहे. चीनने या यंत्रणेला ‘डीपसीक’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान येताच आता ‘चॅट जीपीटी’सारख्या ‘एआय’ यंत्रणांची झोप उडाली आहे. ‘डीपसीक’ची निर्मिती ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या क्षेत्रातील अभूतपूर्व आणि घटना आहे,’ अशा शब्दांमध्ये मार्क अण्ड्रिसेन यांनी ‘डीपसीक’चे वर्णन केले आहे. हे अण्ड्रिसेन अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील भांडवली गुंतवणूकदार आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. चीनचे हे नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेचे मॉडेल अमेरिकेत सध्या आघाडीवर असलेल्या चॅट जीपीटीइतके चांगले असल्याचे ‘डीपसीक’ने म्हटले आहे. शिवाय, ते विकसित करण्यासाठी लागणारा तुलनेने फार कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्या या प्रकारची अ‍ॅप, मॉडेल्स विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च करतात; पण ‘डीपसीक अ‍ॅप’ ६० लाख डॉलर्सपेक्षाही कमी रकमेत विकसित करण्यात आले असल्याचा दावा या अ‍ॅपच्या संशोधकांनी केला आहे. ‘डीपसीक’ या चिनी कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीची स्थापना चीनमधल्या हांगझाऊ या आग्नेय शहरात झाली. कंपनी २०२३ मध्ये स्थापन झाली असली, तरी त्यांचे लोकप्रिय अ‍ॅप अमेरिकेत १० जानेवारी २०२५ ला लाँच झाले.
 
 
‘Artificial Intelligence’
 
‘डीपसीक’ला भांडवली मदत करण्यासाठी लिआंग वेनफेंग यांनी ‘हेज’ या फंडाचीही स्थापना केली. त्यातून आलेल्या निधीतून ते ‘डीपसीक’चा अर्धा खर्च भागवू शकले. वेनफेंग ४० वर्षांचे असून माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेत. ‘एनव्हिडिया ए १००’ या अमेरिकन कंपनीच्या चिपचे एक स्टोअर उभारले होते. ‘एनव्हिडिया’च्या चिपची चीनला निर्यात करण्यावर आता बंदी आहे. तज्ज्ञांच्या मते, वेनफेंग यांच्याकडे जवळपास ५० हजार चिप संग्रही होत्या. त्यामुळेच त्यांना ‘डीपसीक’ लाँच करता आली. स्वस्त आणि कमी दर्जाच्या चिप्सबरोबर जोडलेल्या या चिप्स अजूनही आयातीसाठी उपलब्ध आहेत. अलिकडेच ‘आर्टिफिशियल क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चीनचे पंतप्रधान ली किआंग यांच्यातील बैठकीत लिआंग दिसले होते. ‘डीपसीक’हे अ‍ॅप ‘अ‍ॅपल स्टोअर’वर आणि कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅपची सेवा मोफत वापरता येत असल्याने अल्पावधीतच अ‍ॅपल स्टोअरच्या सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणार्‍या अ‍ॅप्सच्या यादीत त्याने जागा मिळविली. सर्वाधिक रेटिंग मिळालेले मोफत अ‍ॅप म्हणूनही या अ‍ॅपला मान्यता मिळत आहे. ‘चॅट जीपीटी’प्रमाणेच ‘डीपसीक’मध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेता येते. हे अ‍ॅप तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि तुमचे आयुष्य चांगले करण्यासाठी बनवले गेले आहे, असे ‘अ‍ॅपल स्टोअर’वर दिलेल्या अ‍ॅपच्या माहितीत म्हटले आहे. हे अ‍ॅप राजकीय प्रश्नांचे उत्तर देणे टाळते.
‘Artificial Intelligence’ : ४ जून १९८९ रोजी चीनमधील तियानमेन चौकात घडलेल्या नरसंहाराविषयी असता ‘डीपसीक’ने ‘माफ करा. मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. मी लोकांना मदत करण्यासाठी आहे आणि कुणालाही त्रास होऊ नये अशी उत्तरे देण्यासाठी बनवण्यात आलेला कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला सहकारी आहे’ असे म्हटले. ‘डीपसीक’च्या कमी खर्चाच्या दाव्याने आर्थिक बाजारात २७ जानेवारीला फार मोठी ढवळाढवळ केली. या घटनेमुळे नॅसडॅक कंपोझिट तीन टक्क्यांनी खाली आला. त्याचा प्रभाव जगभरातील चिप मार्केट आणि डेटाचे व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांना सोसावा लागला. याचा सर्वाधिक फटका ‘एनव्हिडिया’ या अमेरिकास्थित सेमीकंडक्टकर चिप बनवणार्‍या कंपनीला बसला. ‘डीपसीक’ची माहिती पुढे येताच ‘एनव्हिडिया’ कंपनीच्या शेअरची किंमत १७ टक्क्यांनी घसरली. त्यामुळे कंपनीचे एकाच दिवसात ६०० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. अमेरिकेच्या इतिहासात कंपनीला एका दिवसात सोसावे लागलेले हे सर्वाधिक नुकसान आहे. त्याआधी शेअर मार्केटच्या बाजारात ‘एनव्हिडिया’ पहिल्या क्रमांकावर असणारी कंपनी होती; मात्र सोमवारी कंपनीची किंमत ३.५ लाख कोटी डॉलर्सवरून २.९ लाख कोटी डॉलर्सवर आल्यामुळे अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यानंतर ‘एनव्हिडिया’ तिसर्‍या क्रमांकावर येऊन पोहोचली. ‘एनव्हिडिया’ने तयार केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सपेक्षा कमी गुणवत्तेच्या चिप्स वापरल्या जातात.
 
 
मोठी गुंतवणूक आणि सर्वोत्तम दर्जाचा माल वापरूनच कृत्रिम बुद्धिमत्तेवर ताबा मिळवता येऊ शकतो, या समजुतीला ‘डीपसीक’च्या यशामुळे तडा बसला आहे. त्यामुळे अशा चिपची भविष्यात किती गरज पडू शकते यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘डीपसीक एआय’ ने तंत्रज्ञानस्नेही तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणार्‍यांचे लक्ष स्वत:कडे ओढून घेतले अ‍ॅप स्टोअरवर तर या ‘डीपसीक’ने ‘ओपन एआय’ या कंपनीच्या ‘चॅट जीपीटी’लाही मागे टाकले आहे. ‘डीपसीक’ने दिलेल्या सुविधांकडे संपूर्ण जग आकर्षित झाले असून ‘चॅट जीपीटी’, ‘मेटा एआय’ यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणार्‍या प्लॅटफॉर्म्सची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे चीनी कंपनीने विकसित केलेले हे ‘डीपसीक एआय’ मोबाईल तसेच लॅपटॉपवरही वापरता येणार या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा परवाना सध्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) या संस्थेकडे आहे. कुठल्याही अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी हा एक खुला आणि मोफत असा मंच आहे. यावर वैयक्तिक तसेच कार्यालयीन समस्यांवर उत्तरे शोधता येतात. ‘प्ले स्टोअर’वरून तसेच ‘आयओएस स्टोअर’वरून हे अ‍ॅप इन्स्टॉल करता येते. अमेरिकेने चिप पुरण्यास बंदी घातल्यानंतर ‘डीपसीक’ने लाँच करण्यात आलेले ‘एआय मॉडेल’ हे ‘एनव्हिडिया’ कंपनीच्या कमी कार्यक्षमता असलेल्या एच८०० चिपच्या मदतीने विकसित करण्यात आले असल्याचा दावा केला आहे. या कंपनीचा हा दावा म्हणजे अमेरिकेला एक प्रकारची चपराक आहे.
 
 
‘Artificial Intelligence’ : ‘डीपसीक एआय असिस्टंट’ने डाऊनलोडिंगच्या बाबतीत ‘ओपन एआय’च्या ‘चॅट जीपीटी’ला मागे टाकले आहे. ‘डीपसीक’ कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, अद्याप नीट समजलेले नाही. ‘डीपसीक’ या चॅटबॉटमुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्येही हाहाकार उडाला. अनेक टेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले. भारतातही त्याचा परिणाम झाला. ‘डीपसीक’ या चॅटबॉटमुळे भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या काही टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या दोन ते तीन सत्रांमध्ये साधारण ५० टक्क्यांपर्यंत घसरले. म्हणजेच काही कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य हे साधारण टक्क्यांपर्यंत खाली आले. घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये अनंत राज, ‘नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया’, ‘झेन टेक्नॉलॉजीज’ यांच्यासह इतरही काही कंपन्यांचा समावेश आहे. ‘अनंत राज लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले. या कंपनीला लोअर सर्किट लागले. ‘नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरचे मूल्यदेखील १० टक्क्यांनी कमी होऊन १,४६०.३५ रुपयांवर बंद झाले. जगातील मोठमोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसत असताना हुआंगची निव्वळ संपत्ती २०२३ च्या सुरुवातीपासून शुक्रवारपर्यंत सुमारे आठ पट वाढून १२१ अब्ज डॉलर झाली. दरम्यान, याच कालावधीत झुकेर बर्गची संपत्ती ३८५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज डॉलर झाली आणि ‘अ‍ॅमेझॉन’च्या जेफ बेझोस यांची संपत्ती १३३ टक्क्यांनी वाढून २५४ अब्ज डॉलर झाली.
 
 
‘Artificial Intelligence’ : ‘डीपसीक’ मॉडेल विकसित करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीवर आणि ‘टॉप ऑफ द लाईन चिप्स’वर अवलंबून राहिले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे चिनी कंपन्यांकडे शक्तिशाली ‘जीपीयू’ किंवा ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स’पर्यंत मर्यादित प्रवेश आहे. अनेक पाश्चात्त्य कंपन्या त्यांच्यावर विसंबून राहतात. कारण अमेरिकेचे सरकार अत्यंत प्रगत चिप्सवर कठोर निर्यात नियंत्रणे लादते. त्याला आता ‘डीपसीक’ हा पर्याय आहे. चांगल्या कामासाठी हे तंत्रज्ञान वापरले, तर कुणाचा विरोध असणार नाही; परंतु चीनचा भर अमेरिकेला धडा शिकवण्यावर असल्याने त्यातून चांगले काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.