दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    दिनांक :20-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 सरहद पुणे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून राजधानी दिल्लीत प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दोन सत्रात होणार आहे. संमेलनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात होणार आहे. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
 
 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025  
 
यानंतर उद्घाटनाचे दुसरे सत्र सायंकाळी 6.30 वाजता साहित्य संमेलन होणार असलेल्या तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री सुशीलकुमार शदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्रात संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित राहतील. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचेही यावेळी भाषण होणार आहे.तत्पूर्वी, सकाळी ध्वजारोहण होणार असून, ग्रंथदिंडीही काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे.
 
तालकटोरा स्टेडियममधील संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले असून, याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण आणि महात्मा फुले अशा तीन महापुरुषांच्या नावांच्या सभामंडपात संमेलनाचे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे. साहित्यनगरीच्या प्रवेशद्वाराला अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.
संमेलनाची जय्यत तयारी झाली असून, पुण्यातून एका विशेष रेल्वेगाडीने 1200 प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहेत. सरहदचे संस्थापक संजय नहार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीतेसाठी झटत आहे.