नागपूर,
Nag river Nagpur : नागनदी स्वच्छ करण्याचे काम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी हाती घेतल्या जाते. मात्र पाणी तुंबण्याचा प्रकार वारंवार होत असलेल्या भागांतील अतिक्रमण कधीच हटविण्यात येत नाही. धंतोली झोन कार्यालयासमोर नाग नदीच्या पात्रात मोक्षधाम घाटाचे अतिक्रमण झाले आहे. मोक्षधाम घाट परिसरात विद्युत शवदाहिनीचे बांधकाम पूर्णतः नाग नदीच्या पात्रात करण्यात आल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामासाठी नाग नदीचा एक प्रवाह मार्ग बंद करण्यात आला आहे, तर अन्य एका अरुंद मार्गातून नाग नदीचे पाणी वाहत आहे. अंबाझरीपासून तर सीताबर्डी, मोक्षधाम घाट, ग्रेटनागरोड, नंदनवन, पारडीपर्यंत नाग नदीच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढले आहे. याकडे मनापाचे दुर्लक्ष होत असल्याने नाग नदीचे पात्र अरुंद झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी नाग नदीच्या पात्रातील सर्व अडथळे दूर करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणे पुन्हा पुराचा फटका नदीलगत राहत असलेल्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी नदीच्या प्रवाहात झालेल्या अडथळ्यांमुळे पाणी तुंबण्याचा प्रकार वाढला आहे. यंदा पुन्हा पुराचा फटका बसू नये, याकरिता अतिक्रमण हटविणे आवश्यक झाले आहे. ग्रेट नाग रोडच्या रेल्वेपुलाच्या दुरुस्तीचे काम गत वर्षभरापासून सुरू आहे. रेल्वेपुलाच्या कामासाठी नाग नदीचा एक मार्ग बंद झाल्याने पाणी वाहून जाण्यासाठी एकमेव अरुंद मार्ग उपलब्ध आहे.
गतवर्षी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लोचा फटका हजारोफ्लच्या संख्येतील नागरिकांना बसला होता. सीताबर्डीत पूरस्थिती निर्माण झाल्याने मुंजे चौक ते धंतोली झोन कार्यालयापर्यंतच्या मार्गावर पाणीच पाणी जमा झाले होते. मोक्षधाम रेल्वेपुलाखाली पाणी तुंबलेल्या अवस्थेत होते.
मोक्षधाम घाट परिसरात विद्युत शवदाहिनीकरिता मनपाने नदीच्या पात्रात बांधकाम केले आहे. सिमेंट कॉलमचा अडथळा धोकादायक ठरू शकतो. नाग नदीच्या काठावरील झोपड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नाग नदीच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. पावसाच्या पाण्यात वाहून आलेला केरकचरा अनेक वेळा सिमेंटच्या कॉलममध्ये अडकत असल्याने प्रवाह पूर्णतः प्रभावित होतो.
अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मार्गावरील अडथळे दूर करण्याची गरज आहे. सीताबर्डीत मुंजे चौक, फूल बाजार मार्गावर अवैध पद्धतीने घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नाही. अतिक्रमणधारक घरातील केरकचरा थेट नाग नदीच्या पात्रात टाकून मोकळे होतात. पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा प्रकार थांबविण्यासाठी मनपाला आतापासून सर्व अतिक्रमण हटविण्याशिवाय पर्याय नाही. अंबाझरी मार्ग, सीताबर्डी, पंचशील चौक, यशवंत स्टेडियम, मोक्षधाम घाट, ग्रेटनाग रोड, नंदनवन, पारडीपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. नाग नदीच्या पात्रातील स्वच्छता करताना अवैध बांधकामेदेखील हटविण्याची आवश्यकता आहे.