मोर्शी,
Morshi-sand smuggler : येथील नायब तहसीलदार आपल्या चमूसह अवैध वाळूची तपासणी करीत असताना एका वाळूतस्कराने त्यांना धक्काबुक्की केल्याचा व अन्य एका घटनेत एका अवैध रेतीची वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर रेती टाकून पळ काढल्याची घटना ४ व ५ फेब्रुवारीला मोर्शी शहरात घडली. या दोन्ही प्रकरणी मोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

मोर्शी शहरात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावर आळा बसावा म्हणून मोर्शी तहसीलचे नायब तहसीलदार चारुदत्त पाटील हे आपल्या चमूसह शहरात अवैध वाहतूक करणार्या ट्रॅक्टर व ट्रकची तपासणी करीत होते. ४ फेब्रुवारीला नगर परिषदेच्या नवीन इमारती समोर एमएच २७ बीएक्स ९५५९ क्रमाकांचा अवैध वाळूचा ओव्हरलोड असलेला डम्पर त्यांनी तपासणीसाठी थांबविला. सदर वाहन अवैध गौण खनीज वाहतूक करीत असताना मिळून आले. दरम्यान तेथे शेख बशीर व ३ व्यक्ती आले. पाटील हे आपले शासकीय काम करीत असताना या व्यक्तींनी त्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अळथळा निर्माण केला. या डम्परमध्ये १२ ब्रास अवैध रेती किंमत अंदाजे ६० हजार रुपये असल्याची तक्रार दिली. महसूल अधिकारी यांना धक्काबुक्की करून शासकिय कामात अळथळा निर्माण केल्याचा लेखी रिपोर्ट मोर्शी पोलिस स्टेशनला दाखल केला.
अन्य एका घटनेत ५ फेब्रुवारीला पेठपुरा भागातील कृषी कॉलनी येथे नायब तहसीलदार चारुदत्त पाटील हे आपल्या चमुसह अवैध वाळुची तपासणी करीत असताना ट्रक्टर क्रमांक एमएच ४० सीएच ७१५३ हा अवैध वाळुचा ओव्हरलोड असलेला ट्रक्टर तपासणीसाठी थंबविला असता सदर वाहन अवैध गौण खनीज वाहतूक करीत असताना मिळून आले. त्यास रॉयल्टी विचारले असता त्याने त्या बाबत नकार दिला व तहसील कार्यालय येथे वाहन आण्यास सांगीतले असता सदर आरोपीने रेती रस्त्यावर टाकून दिली. ट्रक्टर व ट्रॉलीसह पळ काढला. यातील अनोळखी ट्रक्टर चालक आपले ताब्यातील ट्रक्टरमध्ये १ ब्रास रेती किमत अंदाजे ६ हजार रुपये चोरुन नेल्याची तक्रार नायब तहसीलदारांनी मोर्शी पोलिस स्टेशनला दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका युवकाला अटक केली आहे. सदर आरोपीची प्रकृती खराब झाल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.