जगण्याचे... बळ... तुकाराम...!

09 Feb 2025 05:50:00
संत प्रबोधन
Saint Tukaram : संत तुकारामांच्या विचारांचे सामर्थ्य हे वर्तमान युगातील प्रत्येक समस्येची सोडवणूक करणारे आहे. त्यांची अभंगवाणी जगातील प्रत्येक व्यक्तीला दिशादर्शक आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
संत तुकारामांच्या अभंगवाणीने अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कारित करण्याचे कार्य केले. समाजमनावर संस्कारांचा फार परिणाम त्यांच्या अभंग रचनेने केला आहे. त्यांच्या अभंग वाङ्मयाशिवाय मराठी साहित्याची व्याख्या पूर्ण होऊच शकत नाही. आज संत तुकारामांच्या अभंग वाङ्मयातील अभंगांना सुविचाराचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. त्यांच्या प्रत्येक अभंगामधून जीवनमूल्यांचा संदेश दिलेला आहे.
 
 
sant-tukaram
 
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा |
येरानी वाहावा भार माथा ॥
आज यंत्रयुगामध्ये सर्वत्र जीवनमूल्यांची होत असतानाच, पदोपदी नीतिमत्तेचा र्‍हास होताना दिसत आहे. परोपकाराची जागा उपद्रवी वृत्तीने घेतलेली आहे. या सर्व उपद्रवी वृत्तींना संत तुकारामांनी साडेचारशे वर्षांआधी प्रखर विरोध करून आपले स्वतंत्र व सोपे जीवनोपयोगी तत्त्वज्ञान मांडले आहे.
पुण्य परउपकार पाप ते परपीडा |
आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥
सत्य तो चि धर्म ते कर्म |
आणीक हे वर्म नाहीं दुजे ॥ध्रु.॥ (तु. गा. १०२१)
असा सोपा तत्त्वज्ञानाचा जीवनमूल्यविचार आपल्या अभंगातून त्यांनी सांगितला. प्रत्येकाला असे वाटावे की, तुकोबा आपल्याच जगण्याची कथा सांगत आहेत.
 
 
वाचा बोलू वेद नीती | करु संती केले ते ॥
तुकोबा त्यामुळेच सर्वांना जवळचे वाटतात. मराठी विचारविश्व आणि संस्कृतीचा असणारा जो भागवत धर्म आहे त्याला अभिप्रेत असणार्‍या भूमिकेप्रमाणे संत तुकाराम हे खरे लोकशिक्षक ठरलेले आहेत.
मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास |
कठीण ऐसे वज्रास भेदू ॥
आपल्या आचरणाच्या माध्यमातून नीतिवान जीवन जगण्याचे धडे जगाला देणारे संत तुकाराम संतांची फक्त लक्षणेच पूर्ण करीत नाहीत, तर खर्‍या संतत्वाच्या कसोटीला त्यांचे जीवन आहे. समाज शिक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य त्यांनी लोकशिक्षकाच्या भूमिकेतून पूर्ण केलेले आहे. मध्ययुगीन काळात त्यांनी मांडलेली लोकशिक्षकाची भूमिका आजही महत्त्वपूर्ण ठरते.
जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा | माळ घालू नये गळा ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा | तृण मागो नये जाणा ॥२॥
म्हणे द्रव्य घेती | देती तेही नरका जाती ॥३॥
(तु. गा. ३०७४)
 
 
Saint Tukaram : संत तुकारामांनी आपल्या अभंग वाङ्मयामध्ये जी मूल्यसंकल्पना मांडलेली आहे, त्यातील प्रत्येक ‘जीवनमूल्य-विचार’ हा जणू ज्ञानाचा, अनुभवाचा व आनंदाचा अमृतकुंभच! ज्याद्वारा मानवी जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होऊन, जीवन अधिक तेजःपुंज व नीतिमान करण्याचा तुकारामांचा अट्टाहास सामान्य व्यक्तीला अलौकिक व समाधानाची अनुभूती देणारा ठरलेला आहे. आजही आपल्याला तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनुभवता येतो. ही त्याची अनुभवप्रामाण्यतेची कसोटी आज यंत्रयुगातही प्रत्येक व्यक्तीला लागू होणारी आहे.
आनंदाचे डोहीं आनंदतरंग |
आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो जालें कांहींचियाबाही |
पुढे चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |
जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥ (तु. गा. ३२४२)
 
 
Saint Tukaram : संत तुकारामांनी सांगितलेली जीवनमूल्ये ही जीवनाला ‘स्वाभिमानी’ व ‘तेजस्वी’ करणारी असून त्याद्वारा कुणालाही आपल्या जीवन कालमर्यादेमध्ये समाधानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचता येऊ शकते. आज सर्वत्र असमाधानाने, भ्रष्टाचाराने जगाला ग्रासलेले आहे. प्रत्येक व्यक्ती व असमाधानी दिसते. त्यामुळेच ती अनैतिक मार्गाने भौतिक सुख मिळवत आहे. त्यातून ना खरे सुख मिळत आहे ना खरे समाधान. जगात आज त्यामुळेच समाधानी वृत्ती निर्माण होण्याची गरज निर्माण झाली आहे. आज समाजामध्ये जी अनैतिकता, अराजकता व भ्रष्टाचारी लोकमानसिकता निर्माण झाली आहे, त्याला संत तुकारामांचा त्यागवाद हा प्रत्युत्तर आहे. जे पैसा कमावून सुख विकत घेऊ इच्छितात, त्यांना समाधान व शांती कधीही प्राप्त होऊ शकणार नाही. समाधान प्राप्तीसाठी संत तुकारामांनी सत्यवादी व नीतिमान असले पाहिजे, अशी शिकवण दिली. आपण केलेले काम सत्य आहे का? असा सवाल त्यांनी विचारावयास सांगितला. आपण केलेले काम असत्य, अनीतिमान असेल, तर आपल्याला कदापि मनःशांती नाही.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही |
मानियले नाही बहुमता ॥
संत तुकारामांनी आपल्या अभंग वाङ्मयातून सात्त्विकतेचा समाधानी भाव निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांचे अभंग वाङ्मय हे अक्षर वाङ्मय ठरलेले आहे. त्याच अक्षर वाङ्मयातील जीवनमूल्यांमुळे संत तुकाराम हे भागवत संप्रदायातील वैचारिक वाङ्:मयाच्या धर्ममंदिराचे कळस ठरले आहेत.
उपाधीच्या नावें घेतला |
नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥
काशासाठीं हात भरूनि धुवावे |
चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥
काही नाहीं देवें करूनि ठेविलें |
असे ते आपुलें ते ते ठायीं ॥३॥
तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार |
तेव्हा आपपर बोळविले ॥४॥
 
 
Saint Tukaram : संत तुकाराम प्रस्तुत अभंगातून उपाधीच्या म्हणजे संकटांच्या, त्रासाच्या नावाने आम्ही घेतला आहे, असे सांगतात. म्हणजे आम्हाला कोणतेही संकट, पीडा त्रास देऊ शकत नाही.
कशासाठी उगीच हात धुवावे? जर, आपण योग्य मार्गावर असू तर. देवांनी काही वेगळी गोष्ट केलेली नसते. आपल्या अंत:करणामध्ये जे काही असेल त्याचीच प्रचीती येत असते. तुकाराम महाराज म्हणतात खर्‍या अर्थाने जेव्हा अहंकार जाईल तीच मनाची खरी व आपपर भावाची बोळवण असेल. असा मन संकल्पनेचा भाव प्रस्तुत अभंगातून ते व्यक्त करतात.
माझी पाठ करा कवी | उट लावी दारोदार ॥१॥
तंव तया पारखी सिव | लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
उष्टावळी करूनि जमा | कुंथुनि प्रेमा आणितसे ॥३॥
तुका म्हणे बाहेरमुदी | आहाच गोविंदीं न सरती ॥४॥
अभंगातून संत तुकाराम महाराज कवित्वाचा गमतीदारपणा सांगतात. जे लोक स्वतःहून दारोदार उट लावतात आणि स्वतःची स्तुती करून घेतात. त्यांना मात्र त्यांची शिव पारखी होते. स्वतःचा लाजिरवाणेपणा समोर येतो. उष्टावळी जमा करून, कुंथून खोटे प्रेम दाखवत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे बाहेर मुदी लोकांना गोविंदाचे प्रेम कसे मिळेल, असा वास्तव संत तुकाराम महाराज व्यक्त करतात. संत तुकारामांचे एकूणच अभंग साहित्य हे जीवन पथदर्शक आहे.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००
 
Powered By Sangraha 9.0