नागपूर,
NAGPUR मेवाती घराण्याचे प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या अत्यंत अभिरुचीसंपन्न गायन मैफलीने रसिकजन तृप्त झाले. वसंत साठे परिवार, मित्र, हितचिंतक व सप्तकतर्फे राष्ट्रप्रेमी, मुत्सद्दी व बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी असलेले वसंत साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी त्यांच्या संगीतमय श्रद्धांंजलीचे आयोजन करण्यात आले होते.

कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, गायत्रीनगर येथे ही सुश्राव्य मैफल पार पडली. पं. संजीव अभ्यंकर यांंनी राग गोरख कल्याणने गायनाला सुरुवात केली. उत्तरोत्तर बहरत गेलेल्या मैफलीत त्यांनी राग मारू बिहाग सादर करीत श्रोत्यांचे मन जिंकले. त्यांच्या एक एक स्वराचा, शब्दाचा नाद सभागृहात आनंद पसरवत गेला. ख्याल गायन, मिश्र देस रागात होरीचे पद, संतरचना, अभंगरचना आदींचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले.वसंत साठे भारतीय बैठकीत विनम्रपणे मागे बसत, अशी माणसे राजकारणात कमी असतात. मला त्यांचे उदंड प्रेम लाभले, अशी हृद्य आठवण पं. अभ्यंकर यांनी याप्रसंगी सांगितली. कार्यक्रमाचे निवेदन वसंत साठे यांचे दीर्घकालिन निकटवर्ती अभय भावे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. उदय गुप्ते यांनी केले. संवादिनीवर अभिषेक शिनकर, तबला अजिंक्य जोशी, तानपुरा रुद्रप्रताप दुबे आणि अबोली देशपांडे तर तालवाद्यावर गजानन रानडे यांनी साथ दिली.
बापूंचे नागपुरात स्मारक व्हावे
बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी असलेले बापू उर्फ वसंतराव साठे यांचा नागपूर व विदर्भाच्या विकासात मोठा वाटा असल्याने, त्यांचे नागपुरात स्मारक व्हावे, अशी इच्छा वसंत साठे यांच्या भगिनी लता मुरुगकर यांनी आठवणींना उजाळा देताना व्यक्त केली. साठे यांच्या जडणघडणीत उच्चशिक्षित आईवडील, सुजाण आप्त आणि स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा वाटा होता. नितीशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, मनमिळावू, घनिष्ट मैत्री करणारे, समर्पित, प्रसन्न व सहिष्णू वसंत साठे यांनी देशातील सांस्कृतिक वातावरण फुलवत ध्येयपुर्तीकडे वाटचाल केली, असे मुरुगकर म्हणाल्या.