नागपूर,
Nitin Sambre : समाजातील वंचित घटकांसाठी असलेल्या शासकीय योजना प्रभावीपणे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सर्वांना न्याय व प्रशासन आपल्या दारी आल्याची अनुभूती या शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येकाला घेता येणे शक्य झाले आहे. अनेक पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनांच्या लाभांसह हा विश्वास येथून घेतल्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश तथा नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी केले.

पारडसिंगा येथील श्री सती अनसूया माता मंदिर परिसरात विधि सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उदघाटन आज झाले. ‘भारतीय न्याय संहिता 2023’ छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन न्या. नितीन सांबरे यांनी केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी या प्रदर्शनाची माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अभय मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, आ. चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प.चे सीईओ विनायक महामुनी, उच्च न्यायालय विधि सेवा खंडपीठ उपसमितीचे सचिव अनिलकुमार शर्मा, काटोल दिवाणी न्यायाधीश एम. झेड. ए. ए. कुरेशी उपस्थित होते.
न्या. नितीन सांबरे म्हणाले की, सर्वसामान्यांना शासकीय योजनांद्वारे न्याय देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची बाब आनंददायी आहे. सर्व शाळांमध्ये आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ग्रामीणमध्ये स्वयंरोजगाराला चालना देणाèया हातमागाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे न्या. नितीन सांबरे म्हणाले. कृषी क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या युवा अभियंत्यांचा त्यांनी गौरव केला.
न्या. अभय मंत्री, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, आ. चरणसिंह ठाकूर यांनी भावना व्यक्त केल्या. दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या सुशिला खडसे व इंदूबाई सायरे या आजींना प्रमाणपत्र तसेच निवडक लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. संचालन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गौरी जांगडे देशपांडे, वरिष्ठ दिवाणी न्या. प्रितेश देशपांडे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील यांनी आभार व्यक्त केले.